Join us  

मुंबईमध्ये स्वाइन फ्ल्यूसह एच३एन२चा धोका; कुलाबा, ग्रँट रोड, प्रभादेवी, वरळीत सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 12:49 PM

रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

मुंबई : मुंबईतील चार विभागांमध्ये स्वाइन फ्ल्यूसह एच३एन२चा धोका वाढत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यात कुलाबा, ग्रँट रोड, प्रभादेवी आणि वरळी या विभागात स्वाइन फ्ल्यूसह एच३एन२चे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत मुंबईत या दोन्ही विषाणूंच्या १४१ रुग्णांची नोंद झाली असून सद्य:स्थितीत १४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यातील नऊ रुग्ण एच३एन२चे असून पाच रुग्ण स्वाइन फ्ल्यूचे आहेत.  

रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. याखेरीज, या विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालिका रुग्णालयात पुरेसा औषध साठा असून दिवसभरात २०० चाचण्यांची क्षमता असल्याचे पालिकेने कळविले आहे. पालिकेच्या केईएम आणि कस्तुरबा रुग्णालयात चाचण्यांची सोय करण्यात आली आहे. पालिकेच्या सर्व शहर उपनगरातील रुग्णालयांमध्ये या विषाणूंच्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार केल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

खासगी तज्ज्ञांनाही सूचना

शहर उपनगरातील खासगी वैद्यकीय तज्ज्ञांना इन्फ्ल्यूएंझा नियंत्रण व प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात २४ तासांत एखाद्या रुग्णाचा ताप कमी न आल्यास वैद्यकीय अहवालांची प्रतिक्षा न करता त्वरित ऑसेलटॅमीवीर औषध सुरू करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :स्वाईन फ्लूमुंबई