वडगाव मावळ : तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीसाठी साठवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयिताला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दिलीप ऊर्फ पिंटू चंपालाल मुथा (वय ४८, रा. वडगाव मावळ) असे कोठडी सुनावलेल्याचे नाव आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी राजेंद्र काकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. त्यात गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण ६८,०४६ रुपयांचे पदार्थ जप्त केले होते. मुथा यांच्यावर वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या पथकाने मुथाला अटक केली. अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र काकडे म्हणाले, ‘‘ शासनाने गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थाची विक्रीवर प्रतिबंध केला आहे. चोरट्या मार्गाने या पदार्थांची तस्करी करून वाढीव किमतीने गुटख्याची विक्री करीत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग मावळ तालुक्यात बेकायदा गुटखा विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करणार आहे.’’ (वार्ताहर)