Join us

अंबरनाथमध्ये ‘गुटखा द्या मते घ्या’

By admin | Updated: April 17, 2015 22:56 IST

मतदारांकडून मते मिळविण्यासाठी उमेदवार काहीही करण्यास तयार आहेत. काहींना बिर्याणी, काहींना दारू तर काहींना गुटख्याची पाकिटे देण्याचा प्रकार घडत आहे.

अंबरनाथ : मतदारांकडून मते मिळविण्यासाठी उमेदवार काहीही करण्यास तयार आहेत. काहींना बिर्याणी, काहींना दारू तर काहींना गुटख्याची पाकिटे देण्याचा प्रकार घडत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पालिकेचे भरारी पथक आणि पोलीस बंदोबस्त चोख करत आहेत. त्यातच कमलाकरनगर रोडच्या कडेला काही अज्ञात व्यक्तींनी पाच गोण्या भरून गुटख्याची पाकिटे टाकल्याने हा गुटखा आला कोठून, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे. राज्यात गुटखाबंदी असतानाही चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात गुटखा राज्यात येत आहे. त्यातच अंबरनाथ-बदलापुरात निवडणुकीचा ज्वर असल्याने मतदारांना खूश करण्यासाठी दारू आणि गुटख्याचे आमिष दाखविण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळात गुटखा वाटण्यासाठी गोण्या भरून काही उमेदवार साठा करून ठेवत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची आवक होत असल्याचे शुक्रवारी पहाटे उघड झाले. कमलाकरनगर येथील रस्त्याच्या कडेला पाच गोण्या भरून गुटख्याची पाकिटे फेकण्यात आली होती. सकाळी या गोण्यांकडे नागरिकांची नजर पडली. या प्रकरणी कृष्णा रसाळ पाटील यांनी लागलीच पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तो जप्त केला असला तरी ज्यांनी ही पाकिटे फेकली, त्यांना ताब्यात घेतलेले नाही. हा गुटखा नकली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे