Join us

गुरु गोविंदसिंग अध्यासन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:06 IST

सरहद संस्थेचे राज्यपालांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामधील ''गुरू गोविंद सिंग'' अध्यासनासाठी ...

सरहद संस्थेचे राज्यपालांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामधील ''गुरू गोविंद सिंग'' अध्यासनासाठी केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या २२ कोटी रुपयांचा विनियोग त्वरित व्हावा. जागतिक दर्जाच्या या अध्यासन केंद्र उभारणीसाठी पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी करीत सरहद संस्थेच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले.

गुरु गोविंदसिंग हे जसे शूर योद्धे होते तसेच ते लेखक, कवी आणि नाटककारही होते. त्यामुळे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात जागतिक दर्जाचे अध्यासन केंद्र व्हावे आणि त्यास गुरु गोविंदसिंग यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सरहदतर्फे करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कोटी रुपये, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या माध्यामातून २२ कोटी रुपये मंजूर केले. त्यापैकी १२ कोटी रुपये विद्यापीठाकडे जमा झाले आहेत. मात्र, रक्कम प्राप्त होऊनही कामाने वेग घेतला नसल्याने सरहदने नाराजी व्यक्त केली आहे.

प्रकाशपर्वाचे ४००वे वर्ष

हे वर्ष गुरु तेगबहादूरजी यांच्या प्रकाशपर्वाचे ४००वे वर्ष आहे. त्यामुळे या वर्षात अध्यासनाचे काम पूर्ण होऊन, त्यास जागतिक दर्जा मिळावा, यासाठी हस्तक्षेप करण्यात यावा. तसेच गरज भासल्यास निधी उपलब्ध करून देण्याची विनंती राज्यपालांना करण्यात आली आहे. सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, भारत देसडला, संतसिंग मोखा यांच्या वतीने हे निवेदन राज्यपालांना सादर करण्यात आले.