Join us  

संयुक्त मराठी विषय शिकवण्यासाठी गुजराती माध्यमाच्या शिक्षिका, शिक्षण निरीक्षक पश्चिम विभागाचा सावळा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 5:50 PM

संयुक्त मराठी विषयांचे प्रशिक्षण चक्क गुजराती विषय शिकवणाऱ्या शिक्षिका प्रतिमा पांडे यांनी दिले.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई- दहावीच्या अभ्यासक्रमाच्या हिंदी विषयाचे प्रशिक्षण पालिकेच्या आठवीच्या शिक्षकांकडून घेतल्याचा अंधेरी पश्चिम येथील सी.डी.बर्फीवाला शाळेतील अजब प्रकार दि,11 रोजी घडला असतानाच याच शाळेत दि,11 रोजी संयुक्त मराठी विषयांचे प्रशिक्षण चक्क गुजराती विषय शिकवणाऱ्या शिक्षिका प्रतिमा पांडे यांनी दिले. देशीची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आणि उपनगर पालक मंत्री विनोद तावडे यांच्या उपनगरात मराठीची अशी दैनावस्था झाल्याबद्धल अनेक शिक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.आज दुपारी 1 वाजून 21 मिनिटांनी दहावीच्या अभ्यासक्रमच्या हिंदी विषयाचे प्रशिक्षण पालिकेच्या आठवीच्या शिक्षकांकडून अंधेरी पश्चिम येथील सी.डी.बर्फीवाला शाळेतील अजब प्रकार ही बातमी ऑनलाईन लोकमतवर राज्यातील सुमारे 5000 शिक्षकांच्या अनेक वॉट्स अप ग्रुपवर व्हायरल झाल्यावर त्यांचे जोरदार पडसाद उमटले. सी .डी.बर्फीवाला शाळेत संयुक्त मराठी विषयाबाबत देखिल धक्कादायक प्रकार घडला याची सविस्तर आखो देखा हाल या खार येथील खार एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक व शिक्षण विकास मंचचे समन्वयक माधव सूर्यवंशी यांनी लोकमतला दिली.खासदार सुप्रिया सुळे या शिक्षण विकास मंचच्या निमंत्रक आहे.इयत्ता दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांचे तालुकास्तरावरील मराठी,इंग्रजी,हिंदी व गुजराथी माध्यमाच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण वर्गाचे शिक्षण निरीक्षक पश्चिम विभागाने दि,9 एप्रिल ते 20 एप्रिल पर्यंत पश्चिम उपनगरात आयोजन केले आहे.माधव सूर्यवंशी यांनी सांगितले की,मी स्वतः संयुक्त मराठी विषयाचे प्रशिक्षण घेण्यासाठी बुधवार दि, 11  रोजी अंधेरी पश्चिम डीएननगर येथील सीडी बर्फीवाला शाळेत गेलो होतो.या ठिकाणी झालेले प्रशिक्षण हे खूपच निकृष्ट दर्जाचे होते.या प्रशिक्षणासाठी मुंबईतील संयुक्त मराठी विषयाचे अध्यापन करणारे मराठी ,इंग्रजी, गुजराती माध्यमाचे शिक्षक होते.जे विषय तज्ज्ञ  होते ते गुजराती विषयाचे आणि प्रशिक्षण देणार मराठीचे यालाही काही आक्षेप नाही पण भाषेवर असणारे प्रभुत्व या विषयाचा,आशयाचा काही अभ्यास..? उच्चारणात असणाऱ्या असंख्य चुका .? मराठी विषय शिकवायला आम्हाला एक मराठी शिक्षक मिळू नये.?एवढी वाईट अवस्था झाली आहे का आमची.? या सर्व प्रकाराकडे शिक्षण विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे असा ठाम आरोप त्यांनी केला. विषयतज्ज्ञ असणाऱ्या मान्यवरानी पहिलेच वाक्य उच्चारले की हे प्रशिक्षण मराठी विषयाचे असलेतरी मी हिंदीतून बोलणार आहे मात्र काही शिक्षकानी नापसंती व्यक्त केल्यानंतर गुजराती मिश्रित मराठीतून त्यांनी बोलण्यास सुरूवात केली.सारांश,गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत मी पहिल्यांदाच इतक्या निकृष्ट दर्जाचे प्रशिक्षण घेतले आहे.कृपया यात सुधारणा व्हाव्यात ही विनंती त्यांनी चक्क पश्चिम विभाग शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांच्याकडे केली आहे.मात्र इयत्ता दहावीचे पुस्तके सुंदर व सुबक आकारात  शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदरच विद्यार्थी आणि शिक्षकाच्या हाती आले आहेत या बद्धल त्यांनी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे अभिनंदन देखिल केले आहे. तर या प्रशिक्षणाबद्धल सध्या पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या सावळ्या गोंधळा बाबत विनोद तावडे यांनी जातीने लक्ष घालण्याची मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,मुंबईचे माजी सदस्य उदय नरे यांनी केली आहे.शिक्षण विभागाने राज्यातील हुशार व तज्ञ व अनुभवी शिक्षकांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी तयार करावे. व त्यांची नियुक्ती करावी. यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावेल व योग्य ज्ञान प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या शिक्षकांना मिळेल व त्यांचा फायदा विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पश्चिम विभागीय शिक्षण विभागाच्या या सावळ्या गोंधळाबाबत अनिल साबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.