Join us
Daily Top 2Weekly Top 5

विनाहेल्मेट दुचाकीस्वारांची धरपकड

By admin | Updated: August 19, 2016 04:04 IST

हेल्मेट परिधान न केल्यामुळे होणाऱ्या अपघातांत दुचाकीस्वार आणि सहकाऱ्याला जीव गमवावा लागतो. त्यामुळे शासनाकडून हेल्मेट सक्ती करण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले.

मुंबई : हेल्मेट परिधान न केल्यामुळे होणाऱ्या अपघातांत दुचाकीस्वार आणि सहकाऱ्याला जीव गमवावा लागतो. त्यामुळे शासनाकडून हेल्मेट सक्ती करण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर १६ आॅगस्टपासून मुंबईत हेल्मेट सक्तीसाठी दुचाकीस्वारांवर कठोर कारवाईला सुरुवात करण्यात आली. कारवाई सुरू होताच दोन दिवसांत १,६१४ दुचाकीस्वार वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती देण्यात आली. यात पेट्रोल पंपावर करण्यात येत असलेल्या कारवाईचाही समावेश आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अपघातांत दुचाकीस्वारांना आणि त्याच्या सहकाऱ्यांना प्राण गमवावे लागतात. हेल्मेट परिधान न केल्याने प्राण गमवावे लागल्याची बाब समोर येताच शासनाकडून हेल्मेट सक्तीचा निर्णय जानेवारी महिन्यात घेण्यात आला. मात्र ही सक्ती करूनही त्याला दुचाकीस्वारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर हेल्मेट सक्तीबाबत दुचाकीस्वारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने परिवहन विभागाकडून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चा नियम काढण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून करण्याचा निर्णय घेतला. ज्यांच्याकडे हेल्मेट नाही त्याला पेट्रोल न देण्याचा निर्णय घेण्यात आला. पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या चालकाने हेल्मेट परिधान केले नसेल तर त्यावर कारवाई करतानाच त्याला सहकार्य करणाऱ्या पेट्रोलपंप चालकांवरही कारवाई करण्यात येणार होती. या निर्णयाला विरोध होताच शासनाकडून निर्णय मागे घेण्यात आला आणि पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या दुचाकीस्वारांच्या वाहनांचे नंबर घेण्यास पंपचालक-मालकांना सांगण्यात आले. परंतु त्याला विरोध केल्यानंतर अखेर वाहतूक पोलिसांनी पेट्रोल पंपावर येणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी जनजागृती मोहीम हाती घेतली. १ ते १५ आॅगस्टपर्यंत जनजागृती मोहीम घेतल्यानंतर अखेर १६ आॅगस्टपासून संपूर्ण मुंबईत हेल्मेट सक्तीबरोबरच दुचाकीस्वारांवर नव्या दंडानुसार कठोर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेतला. यात पेट्रोलपंपावर येणाऱ्या दुचाकीस्वारांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. १६ आणि १७ आॅगस्ट रोजी वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वारांविरोधात केलेल्या कारवाईत १ हजार ६१४ जण जाळ्यात अडकल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. १६ आॅगस्ट रोजी ८८९ तर १७ आॅगस्ट रोजी ७२५ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. वरळी परिसरात सर्वाधिक कारवाई होत असून त्यानंतर नागपाडा, वांद्रे, सांताक्रुझ, पायधुनी या भागांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)