Join us

खासगी शाळांविरोधात पालक आक्रमक

By admin | Updated: April 24, 2017 02:47 IST

खासगी शाळा दरवर्षी मनमानी करून शुल्कात अवास्तव वाढ करतात. पालक शाळा प्रशासनाशी चर्चा करून शुल्कात इतक्या

मुंबई: खासगी शाळा दरवर्षी मनमानी करून शुल्कात अवास्तव वाढ करतात. पालक शाळा प्रशासनाशी चर्चा करून शुल्कात इतक्या प्रमाणात वाढ करण्यात येऊ नये, म्हणून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. तरीही दरवर्षी होणाऱ्या शुल्कवाढीमुळे त्रस्त असलेल्या खासगी शाळांविरोधात आता पालकांनी थेट न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात पालकांनी आझाद मैदानात आंदोलन केले होते. फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशनतर्फे शुल्कवाढीविरोधात आंदोलन उभे राहिले आहे, पण तरीही कोणत्याही प्रकारे सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. शिक्षण विभाग नियमांचे उल्लंघन होत असूनही शाळांवर कारवाई करत नाही. त्यामुळे संतप्त पालकांनी न्यायालायात जाण्याची तयारी सुरू केली आहे. या संदर्भात दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आंदोलनात युनिव्हर्सल हाय, लोखंडवाला इंटरनॅशनल हायस्कूल, सिस्टर निवेदिता, गरोडिया हायस्कूल, ठाकूर इंटरनॅशनल, आयईएससारख्या अनेक शाळांतील पालकांनी सहभागी झाले होते. मात्र, त्यानंतरही शुल्कासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे फोरमतर्फे पुन्हा एकदा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत न्यायालयात जाण्याचा मार्ग स्वीकारण्यावर चर्चा झाल्याचे फोरमचे अध्यक्ष जयंत जैन यांनी सांगितले. शुल्कवाढीला आळा बसावा, म्हणून आंदोलनाने कोणताही फरक पडलेला नाही. त्यामुळे आता येत्या दोन दिवसांत विभागवार आंदोलन करण्यात येणार असून, लवकरच त्याची दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर, या संदर्भात आम्ही न्यायालयात जाण्याच्या तयारीत असून, काही कागदोपत्री तयारी पूर्ण केल्यानंतर, हे पाऊल उचलू, असे जैन यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)