Join us  

CoronaVirus News: मुंबईत सक्रिय रुग्ण १० हजारांनी कमी; रुग्ण दुपटीचा कालावधी ५५ दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 7:41 AM

रविवारच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांची संख्याही १० हजारांनी कमी झाली आहे. तर दुसरीकडे रुग्णनिदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

मुंबई : डिसेंबर अखेरपासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण आता कमी होत आहेत. शहर उपनगरात सोमवारी दैनंदिन रुग्णांमध्ये कमालीची घट दिसून आली. शिवाय रविवारच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांची संख्याही १० हजारांनी कमी झाली आहे. तर दुसरीकडे रुग्णनिदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.शहर उपनगरात सोमवारी १५,५५१ रुग्ण बरे झाले आहेत. तर दिवसभरात ५,९५६ रुग्ण आणि १२ मृत्यूंची नोंद आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ५५ दिवसांवर असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ५०,७५७ झाली. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्के आहे. १० ते १६ जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.२२ टक्के आहे. दिवसभरातील ५ हजार रुग्णांपैकी ४ हजार ९४४ रुग्ण लक्षणविरहित आहेत, हे प्रमाण ८३ टक्के आहे. मुंबईत एकूण ९ लाख ५ हजार ८१८ कोरोनाबाधित असून, मृतांचा आकडा १६,४६९ इतका आहे. पालिकेने रुग्णांचा शोध घेण्यासाठी २४ तासात ४७ हजार ५७४ चाचण्या केल्या असून, एकूण १ कोटी ४६ लाख ७० हजार १०४ कोरोना चाचण्या केल्या आहेत. शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय प्रतिबंधित क्षेत्र शून्यावर आले आहे, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ४७ आहे. मागील २४ तासात रुग्णांच्या संपर्कातील २० हजार ६१८ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या