Join us

आंदोलक शेतकऱ्यांचा जथा आझाद मैदानात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. विविध वाहनांतून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले असून, सोमवारी जाहीर सभेने शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.

किसान सभेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आंदोलनाची घोषणा झाली आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी शेतकऱ्यांचा जथा इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथून मुंबईसाठी निघाला. अडीच तास चालून कसाऱ्याजवळ त्यांनी पुन्हा गाड्यांमध्ये बसून आपली आगेकूच सुरू केली. १५ हजार शेतकरी कसारा घाट पायी उतरले. त्यानंतर वाहनांतून निघालेल्या आंदोलकांचे कल्याण फाटा, ठाणे शहर व मुंबई शहरात जनतेकडून उत्स्फूर्त स्वागत झाल्याचे किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले.

इगतपुरी, शहापूर तालुक्यांच्या अनेक करखान्यांसमोर सीटूच्या कामगारांनी शेतकरी जथ्याचे स्वागत केले. कल्याण फाट्यावर आणि ठाणे शहरात विविध डाव्या संघटना, संस्थांसोबतच शिवसेना नेत्यांनी आंदोलकांचे स्वागत केले. रविवारी सायंकाळी वाहने आझाद मैदानाजवळ पोहोचली. येथे संयुक्त शेतकरी कामगार मोर्चातर्फे सुरू झालेल्या महामुक्काम आंदोलनात ते सामील झाले.

सोमवारी सकाळी ११ ते २ या वेळेत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाकडे निघणार आहे. तिन्ही कृषी कायदे आणि चारही श्रम संहिता रद्द करा, वीज विधेयक मागे घ्या आणि शेतकऱ्यांसाठी रास्त हमी भावाचा कायदा करा, या मुख्य मागण्या केल्या जाणार आहेत. तर २६ जानेवारी, प्रजासत्ताकदिनी राष्ट्रीय ध्वजाचे वंदन आणि राष्ट्रगीत गाऊन तसेच शेतकरी-कामगारांचा लढा कोणत्याही परिस्थितीत विजयी करण्याच्या निर्धारासह कार्यक्रमाची सांगता होईल, असे किसान सभेने स्पष्ट केले.

रविवारी या वाहन जथ्याचे नेतृत्व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्यासह पदाधिकारी आणि विविध डाव्या संघटना, संस्थांच्या प्रतिनिधींनी केले.

.................