Join us
Daily Top 2Weekly Top 5

कळंब-पाषाणे रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: May 31, 2014 02:23 IST

कर्जत एसटी महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारा कर्जतमधील कळंब - पाषाणे -वांगणी मार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे

कर्जत : कर्जत एसटी महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारा कर्जतमधील कळंब - पाषाणे -वांगणी मार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. कायम वर्दळीच्या असलेला हा रस्ता कधी खड्डेमुक्त होईल, याकडे वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. आर्ढे ते पाषाणे पूल येथील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने पावसाळ्यात या रस्त्यावरून एसटी धावणार का, असा प्रश्न समोर येतो. कळंब -वांगणी मार्गावरील कर्जत तालुका हद्दीतील रस्ते तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सव्वा कोटीचा निधी दोन वर्षापूर्वी दिला होता. त्या निधीची बांधकाम विभागाने नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी वाट लावली. त्यामुळे खडीकरण झालेले रस्ते डांबरीकरण करावेत, यासाठी या भागातील रहिवाशांनी आंदोलने केली होती. मात्र कळंब येथून आर्ढे गावापर्यंत पावसाळ्यापूर्वी तयार केलेला रस्ता आज किती वर्षापूर्वी तयार केला आहे, हे विचारावे लागेल, असा सवाल साळोखचे ग्रामस्थ अनिस बुबेरे यांनी उपस्थित केला आहे. पुढे माले गावाजवळ रस्त्याची हीच अवस्था कायम आह. दोन वर्षात रस्त्याची अशी खड्डेमय अवस्था होणार असेल, तर रस्ते करायचे कशाला, असा प्रश्न उभा राहतो. आर्ढे गावापासून पाषाणे गावापर्यंत रस्त्याचा भाग अनेक वर्षापासून डांबरीकरण केलेला नाही. त्यातच त्या भागातील चढावाचा आणि नंतर तीव्र उताराचा भाग लक्षात घेता त्या भागाचे डांबरीकरण सर्वात आधी होणे गरजेचे असतांना तेथे डांबरीकरण करण्यात आले नाही. रस्त्याचा हा भाग डांबरीकरण न करता निधी लाटणार्‍या ठेकेदारांची, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाची चौकशी करावी, अशी मागणी आर्ढे गावातील ग्रामस्थ देवराम धनवटे यांनी केली आहे. सध्या पाषाणे टेकडीवर वाहने नेतांना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि त्यातून निघालेले दगड पाहून प्रामुख्याने रिक्षामधून प्रवाशांना उतरावे लागत आहे, तर तेथून सर्वाधिक उत्पन्न देणार्‍या एसटी गाडीची काय अवस्था होत असेल. रस्त्याची अशीच स्थिती राहिल्यास पावसाळ्यात एसटी गाडीची वाहतूक बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ शकतात.