Join us

ऐरोलीतील उद्यानाचे होणार सुशोभीकरण

By admin | Updated: January 15, 2015 02:06 IST

ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या दुरवस्थेविषयी लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे

नवी मुंबई : ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या दुरवस्थेविषयी लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. रुग्णालयाच्या ठेकेदारामुळे उद्यानाचे अस्तित्व नष्ट झाले असून संबंधिताकडूनच सुशोभीकरणाचे काम करून घेतले जाणार आहे. माता बाल रुग्णालयाला लागून एल आकाराचे आंबेडकर उद्यान आहे. महापालिकेने २००५ मध्ये उद्यानाचे सुशोभीकरण करून तेथे खेळणी बसविली होती. परंतु २०१० मध्ये रुग्णालयाचे बांधकाम सुरू झाले व ठेकेदाराने उद्यानाच्या जागेवर बांधकाम साहित्य ठेवण्यास सुरवात केली. पाच वर्षांपासून नागरिकांना उद्यानाचा वापर करता येत नाही. या जागेचा दुसऱ्या कामासाठी वापर होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त करण्यास सुरवात केली होती. स्थानिक नगरसेवक मनोज हळदणकर यांनी संबंधित ठेकेदाराकडूनच उद्यानाचे काम करून घ्यावी, अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. उद्यानाच्या सद्यस्थितीविषयी लोकमतने १४ जानेवारीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्ताची दखल पालिकेने घेतली. रुग्णालयाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारामुळे उद्यानाची दुरवस्था झाली . त्यामुळे संबंधिताकडूनच उद्यान सुशोभीकरण करून घेण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी दिली. (प्रतिनिधी)