Join us

मुंबई मॅरेथॉनला हिरवा कंदील

By admin | Updated: January 14, 2017 20:33 IST

मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांना जाहिरातबाजीचे शुल्क भरण्यासाठी २४ तासांची आक्रमक मुदत देणाऱ्या महापालिकेने तलवार म्यान केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांना जाहिरातबाजीचे शुल्क भरण्यासाठी २४ तासांची आक्रमक मुदत देणाऱ्या महापालिकेने तलवार म्यान केली आहे. पाच कोटी रुपये शुल्क तात्काळ न भरल्यास खटला दाखल करण्याचा इशारा पालिकेने शुक्रवारी दिला होता. मात्र मुदत संपण्याआधीच प्रशासनाने आयोजकांपुढे गुडघे टेकत अवघ्या २३ लाख रुपये शुल्कावर तडजोड केली आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यावेळीसही वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मॅरॅथॉनला हिरवा कंदील मिळाला आहे. 
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई मॅरॅथॉनचे आयोजन उद्या रविवार दि. १५ जानेवारी २०१७ रोजी करण्यात आले आहे. 'स्टँडर्ड चार्टर्डमार्फत २००४ पासून मुंबईत दरवर्षी मॅरेथॉन आयोजन करण्यात येते. मात्र या स्पर्धेसाठी मुंबईत लावण्यात येणारे फलक-जाहिरातबाजीचे शुल्क चुकवण्यात येत नसल्याने यापूर्वीही अनेकवेळा महापालिका आणि आयोजकांमध्ये वाद झाला आहे. यावेळेस जाहिरातबाजीबरोबरच लेजर शोचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र जाहिरात शुल्क, भू -वापर शुल्क आणि सुरक्षा ठेव जमा करण्यात न आल्याची गंभीर दखल घेत पाच कोटी ४८ लाख ३० हजार ६४३ एवढी रक्कम भरण्याची नोटीस महापालिकेने पाठवली होती. 
ही रक्क्म भरण्यासाठी २४ तासांची मुदतही देण्यात आल्याने आयोजकांचे धाबे दणाणले होते. मात्र २४ तासांमध्ये चक्र उलटे फिरून पालिकेलाच माघार घ्यावी लागली आहे. जाहिरातबाजीच्या शुल्काच्या गैरसमजुतीतून महापालिकेने ही नोटीस पाठवली आहे. मात्र यावर आता चर्चा करण्यासाठी अवधी कमी असल्याने गेल्याच वर्षीप्रमाणेच शुल्क स्वीकारण्याची विनंती आयोजकांनी महापालिकेला केली. त्याअनुसार २३ लाख रुपयांची पे ऑर्डर काढत स्पर्धा झाल्यानंतर १६ जानेवारी रोजी यावर चर्चा करण्यासाठी येऊ, असे आयोजकांनी पालिकेच्या ए विभागाच्या सहायक आयुक्तांना कळवले आहे. 
 
महापालिकेची परवानगी २४ तासांत 
मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांनी पत्र पाठवल्यानंतर ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिग्गवकर यांनी नोटीस मागे घेत या स्पर्धेला परवानगी आज दिली. त्यानुसार उद्या ठरल्याप्रमाणे मुंबई मॅरेथॉन पार पडणार आहे.