Join us

विद्यापीठात भव्य सभामंडप

By admin | Updated: December 30, 2014 01:58 IST

इंडियन सायन्स काँग्रेसची जय्यत तयारी मुंबई विद्यापीठाने केली आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी उभारण्यात येणारा भव्य सभामंडप (हँगर) अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केला जात आहे

मुंबई : इंडियन सायन्स काँग्रेसची जय्यत तयारी मुंबई विद्यापीठाने केली आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी उभारण्यात येणारा भव्य सभामंडप (हँगर) अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केला जात आहे. तो ६० बाय १३० मीटर एवढ्या भव्य आकाराचा असून, पूर्णपणे वातानुकूलित असणार आहे. यामध्ये ८ हजार लोक बसू शकणार असल्याने तो आशियातील पहिलाच भव्य सभामंडप ठरणार आहे.इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद यंदा मुंबई विद्यापीठाला मिळाले असून, या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळ्याचा सभामंडप अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात येत असून, उपस्थितांचा तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.प्रत्येकी १० मीटरच्या अंतरावर दोन खांबांच्या रांगा असणार आहेत. स्टेजवरील दृश्य टिपता यावे यासाठी त्याला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देत कमीतकमी आडव्या खांबांचा वापर करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर हा पहिल्यांदाच या विज्ञान परिषदेच्या मुख्य समारंभाच्या मंडपासाठी करण्यात येत आहे. या प्रकारच्या भव्य मंडपाची उभारणी करण्यासाठी परदेशातून सामानाची आयात करावी लागते. मात्र भारतीय बनावटीच्या आराखड्यातून हा भव्य सभामंडप साकारण्यात येत आहे. त्याचा खर्च जर्मन बनावटीच्या मंडपासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा कित्येक पटीने कमी आहे. यामध्ये वुडन फ्लोरिंग, कार्पेटिंग असून, त्याच्या जोडीला आंतरिक सजावटीवरही भर देण्यात आला आहे. या मंडपामधील स्टेज हेसुद्धा एक आकर्षणाचे केंद्र आहे. या मंडपामध्ये जवळपास ८ हजार लोक बसू शकतील एवढी व्यवस्था केली आहे. (प्रतिनिधी)