कर्जत : कर्जत नगरपरिषद हद्दीत असलेल्या नानामास्तर नगरमध्ये गावठाण विस्तार योजनेंर्गत शासनाने मुद्रे खुर्द व मुद्रे बुद्रुक गावातील ग्रामस्थांना भूखंडाचे वाटप सुमारे तीस वर्षांपूर्वी केले होते. योजनेच्या सुरुवातीला कर्जत - मुरबाड रस्त्यालगत नगरपरिषदेच्या ताब्यात असलेला दोन-अडीच गुंठ्यांचा भूखंड काहीजण हडप करण्याच्या विचारात आहेत. हा डाव हाणून पाडण्यासाठी नानामास्तर नगरचे ग्रामस्थ सरसावले आहेत. त्यांनी संबंधित अधिकार्यांना निवेदन सादर करून हा भूखंड वाचिवण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. तीस वर्षांपूर्वी शासनाने गावठाण विस्तार योजना राबवून दोन्ही गावांतील ग्रामस्थांना सरकारी दरात भूखंडांचे वाटप करण्यात आले होते. पन्नास टक्के ग्रामस्थांनी या भूखंडांवर घरे बांधली तर उर्वरित ग्रामस्थांनी मुदतीनंतर घरे बांधली. तरीही शासनाने त्यांचे भूखंड सरकार जमा केले. या गावठाण विस्तार योजनेच्या सुरु वातीला कर्जत - मुरबाड रस्त्यालगत भिसेगाव येथील खंडागळे कुटुंबियांची दोन -अडीच गुंठे जमीन होती. ती त्यांनी पंचेचाळीस - पन्नास वर्षांपूर्वी तत्कालीन कर्जत ग्रुप ग्रामपंचायतीला दिली. त्या भूखंडावर शाळागृह बांधण्यात आले होते. कालांतराने ते शाळागृह पडले व जागा मोकळी करण्यात आली. ही मोकळी जागा दहा - बारा वर्षांपूर्वी काही ग्रामस्थांनी हडप करण्याचा प्रयत्न केला. परंतु तत्कालीन मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांनी तेथे केलेले बांधकाम तोडून टाकले. त्यानंतर जागेवरील अतिक्रमण टाळण्यासाठी भोवताली कुंपण टाकण्याचा ठराव नगरपरिषदेच्या सभेत करण्यात आला होता. मात्र याबाबत निर्णय न झाल्याने ही जागा लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. ही जागा वाचिवण्यासाठी नानामास्तर नगर मधील ग्रामस्थांनी उप विभागीय अधिकारी कर्जत यांना निवेदन दिले आहे. (वार्ताहर)
अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ एकवटले
By admin | Updated: March 26, 2015 00:55 IST