Join us  

आजी आम्ही जातो...म्हणत दोन भावंडांनी सोडले घर, दहिसरमधील मधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 4:31 AM

’आजी मला पेपरला कमी मार्क मिळाले म्हणुन प्रतिक आणि मी घर सोडून जात आहे. प्रतीक ऐकत नव्हता तो पण माझे सोबत आला आहे.’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून दोन अल्पवयीन नातवंडानी घर सोडल्याचा धक्कादायक प्रकार दहिसरमध्ये घडला.

- मनीषा म्हात्रेमुंबई : ’आजी मला पेपरला कमी मार्क मिळाले म्हणुन प्रतिक आणि मी घर सोडून जात आहे. प्रतीक ऐकत नव्हता तो पण माझे सोबत आला आहे.’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून दोन अल्पवयीन नातवंडानी घर सोडल्याचा धक्कादायक प्रकार दहिसरमध्ये घडला. मुलगा आणि सुनेच्या निधनानंतर ही दोन नातूच त्यांच्यासाठी आधार आहेत. दोघेही असे अचानक निघून गेल्यामुळे आजींना धक्का बसला आहे. आजीच्या तक्रारीवरुन दहिसर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा केला आहे. मात्र ते स्वत: निघून गेले की यामागे कुणाचे षडयंत्र आहे? या दिशेने पोलीस शोध घेत आहेत.     दहिसर पूर्वेच्या जनकल्याण इमारतीत गिता सोपान काळभोर (५८) या  सौरभ (१५) आणि रोहित (१४) (नावात बदल) सोबत राहतात. त्या एका खासगी रुग्णालयात नोकरीस आहेत. २००९ मध्ये त्याच्या आई वडीलांचे आजाराने निधन झाले. तेव्हापासून या दोन नातवंडाचा ते सांभाळ करत आहेत. सौरभ १० तर रोहित ९ वी इयत्तेचे शिक्षण घेत आहे. काळभोर यांची नाईट शिफ्ट सुरु होती. ९ तारखेला त्या नेहमीप्रमाणे कामावर निघून गेल्या. तेव्हा दोन्ही नातू घरीच होते. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता त्या घरी परतल्या तेव्हा दोन्हीही नातू घरात दिसले नाही. ते खेळायला गेले असतील म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पसारा आवरत असताना सोफ्यावर एक चिठ्ठी मिळुन आली. त्यात ’आम्ही दोघे पिकनीकला जात आहोत, आम्हाला यायला उशीर होईल,चावी नेहा दिदिकडे दे,असा मजकूर लिहून त्याखाली दोघांनी सह्या केल्या होत्या.     रात्री उशिरापर्यंत ते परतले नाही.  मुले फिरुन घरी येतील म्हणून शेजारच्याकडे मुले येताच कळविण्यास सांगून त्या कामावर निघून गेल्या.  रात्रीच्या ११ च्या सुमारास मुले आले की नाही हे विचारण्यासाठी त्यांनी शेजारच्या महिलेला कॉल केला. तेव्हा दोन्हीही नातू आले असल्याचे सांगून त्यांच्याशी बोलणेही करुन दिले होते. तेव्हा काळभोर यांनी दोघांना रुग्णालयात येण्यास सांगितले. रात्री उशिरापर्यंत त्यांनी रुग्णालयात वाट पाहिली. मात्र दोघेही तेथे आले नाही.     रविवारी सकाळी ८ च्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे घर गाठले. तेव्हा घराला कुलूप होते. दोन्हीही नातू घरात नव्हते. सोफ्यावर सौरभने लिहिलेली आणखीन चिठ्ठी त्यांच्या हाती लागली. त्या चिठ्ठीतील मजकूराने त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. ’आजी मला पेपरला कमी मार्क मिळाले म्हणुन प्रतीक आणि मी घर सोडून जात आहे. प्रतिक ऐकत नव्हता तो पण माझे सोबत आला आहे. ’ या चिठ्ठीनंतर त्यांनी मित्र मैत्रीणींकडे विचारपूस सुरु केली. मात्र त्यांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. अखेर त्यांनी दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवर दहिसर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. नातेवाईकही गायब...दोन मुलांचा शोध सुरु केला असताना त्यांच्याच जवळचा नातेवाईकही गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे ही मुले स्वत: घर सोडून गेले की यामागे काही षडयंत्र आहे. याचा शोध पोलीस घेत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी दिली. बाळांनो परत या रे..काळभोर यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या निधनांतर सूनही अंथरुणाला खिळली. तिचेही निधन झाले.  गेल्या ९ वर्षांपासून या मुलांसोबत मी राहते. तेच माझे आयुष्य बनले. दहावीच वर्ष असल्यामुळे मी फक्त मुलांना अभ्यास करा. टीव्ही नका पाहू म्हणून सांगायची. त्यांच्याच भल्यासाठी बोलत होते. पण तुमच्या शिवाय मी कशी जगू.. बाळांनो परत या. असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :गुन्हा