Join us

आजी - आजोबांनी साजरा केला ‘व्हॅलेंटाइन डे’

By admin | Updated: February 15, 2017 05:13 IST

‘प्रेम कुणावरही करावं, प्रेम कोणत्याही वयात करावं’ याचा प्रत्यय आज याची देही याची डोळा, दादरच्या नाना-नानी पार्कमध्ये साजरा

मुंबई : ‘प्रेम कुणावरही करावं, प्रेम कोणत्याही वयात करावं’ याचा प्रत्यय आज याची देही याची डोळा, दादरच्या नाना-नानी पार्कमध्ये साजरा करण्यात आलेल्या व्हॅलेंटाइन्स डेला आला. या ठिकाणी आजी-आजोबा आणि नातवंडांनी एकत्र व्हॅलेंटाइन डे साजरा केला. प्रेमाचा दिवस हा तरुणांनी एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस, असा अनेकांनी गैरसमज करून घेतला आहे, पण या गैरसमजाला हेल्प एज इंडियाने आयोजित केलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’ने छेद दिला आहे. ९० वर्षांच्या आजींसह १३० ज्येष्ठ नागरिक सकाळी आठ ते साडेदहा या वेळेत एकत्र जमले होते. त्यांच्याबरोबर ७० लहान मुलेही सहभागी झाली होती. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक लहान मुलांना आजी-आजोबांचे प्रेम मिळत नाही आणि दोन पिढ्यांमधील अंतर वाढत जाते. त्यामुळे हे अंतर कमी करण्यासाठी अशा प्रकारे अनोख्या पद्धतीचा व्हॅलेंटाइन डे दरवर्षी साजरा करण्यात येतो. ज्येष्ठ नागरिकांनी गायन करत, नृत्य सादर केले आणि विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. लहान मुलांनी ज्येष्ठांची करमणूक करण्यासाठी जुनी गाणी सादर केल्याचे हेल्प एजचे अध्यक्ष प्रकाश बोरगावकर यांनी सांगितले.