Join us

आजीच्या मैत्रिणीनेच केला अडीच तोळ्याच्या दागिन्यावर हात साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:06 IST

मुंबई : घरी राहण्यासाठी आलेल्या मैत्रिणीला दागिने दाखवणे वृद्धेला महागात पडले आहे. दागिने पाहण्याच्या बहाण्याने मैत्रिणीने अडीच तोळ्याच्या दागिन्यावर ...

मुंबई : घरी राहण्यासाठी आलेल्या मैत्रिणीला दागिने दाखवणे वृद्धेला महागात पडले आहे. दागिने पाहण्याच्या बहाण्याने मैत्रिणीने अडीच तोळ्याच्या दागिन्यावर हात साफ केला आहे. ही बाब लक्षात येताच वृद्धेने टिळक नगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.

घाटकोपर परिसरात एकट्या राहणाऱ्या ६४ वर्षीय तक्रारदार या इस्टेट ब्रोकर म्हणून काम करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर तिचे पारंपरिक दागिने व हिऱ्यांचे दागिने २० एप्रिल रोजी बँक लॉकरमधून काढून घरी आणले. अशात फेब्रुवारीमध्ये गुजरातहून मुंबईत परतताना ट्रेनमध्ये त्यांची हेमाली जोशी नावाच्या महिलेसोबत ओळख झाली. हेमालीने ती मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करीत असल्याचे व त्यांना कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत असल्याचे सांगितले. याच ओळखीतून एकमेकींचे मोबाईल क्रमांक शेअर केले. दोघींमध्ये मैत्री झाली. १ एप्रिल रोजी हेमालीने शूटिंगसाठी मुंबईत आल्याचे सांगून तक्रारदार यांच्याकडे दोन दिवस राहण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.

ठरल्याप्रमाणे २ एप्रिल रोजी घर गाठले. त्या एकट्याच राहत असल्याने त्यांना घरातील साफसफाई करण्यास मदत केली. त्याच दरम्यान त्यांनी घरातील दागिनेही हेमालीला दाखवले. दागिने कपाटात ठेवून, औषध आणण्यासाठी त्या मेडिकलमध्ये आल्या. अशात ४ एप्रिल रोजी हेमालीने दुपारी साडेबाराच्या सुमारास शुटिंगचे काम आल्याचे सांगून ती घाईघाईत बाहेर पडली. काही दिवसांनी घरातील दागिने बँक लॉकरमध्ये ठेवण्यासाठी तपासले असता, दागिने मिळून आले नाहीत. त्यांना संशय आल्याने त्यांनी हेमालीकडे चौकशी केली. तिने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर फोन घेणे बंद केल्याने त्यांना खात्री पटली की तिनेच चोरी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार टिळक नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.