Join us

आजीने डांबून ठेवल्याची आजोबांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST

मलबार हिल पाेलिसांत धाव : चाकूच्या धाकाने ठार मारण्याची धमकीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पत्नीने चाकूच्या धाकात जिवे ...

मलबार हिल पाेलिसांत धाव : चाकूच्या धाकाने ठार मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पत्नीने चाकूच्या धाकात जिवे ठार मारण्याची धमकी देऊन घरात घरात डांबून ठेवल्याचा आरोप करत ७८ वर्षीय आजोबांनी मलबार हिल पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पाेलिसांनी ७१ वर्षीय पत्नीविरोधात गुन्हा नोंदवला.

मलबार हिल परिसरात ७८ वर्षीय आजोबा ७१ वर्षीय पत्नीसोबत राहण्यास आहेत. त्यांना ३ मुले असून, एक मुलगा नाशिक, दुसरा कॅनडात, तर ५४ वर्षीय मुलगी दिल्लीत राहते. आजाेबांनी केलेल्या तक्रारीनुसार, पत्नीने सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांच्या मदतीने खोटी कागदपत्रे सादर करून फ्लॅट स्वतःच्या नावावर करून फसवणूक केली. याबाबत मलबार हिल पोलिसांकडे आजाेबांनी तक्रार केली असून, त्याबाबत चौकशी सुरू आहे.

दरम्यान, हा फ्लॅट विकायचा असल्यामुळे मी घर सोडून जावे म्हणून पत्नी छळ करते. या वयात मी कुठे जाणार. मला दोन वेळा कोरोना झाला होता. माझी अँँजिओप्लास्टीही झाली असून, मला जास्त चालणे, बोलणेही सहन होत नसल्याचे आजाेबांनी सांगितले. २४ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ७.३० वाजेच्या सुमारास पत्नीने याच वादातून भाजी कापण्याचा चाकू अंगावर राेखून घर सोडून न गेल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आजाेबांचा आराेप आहे. मोलकरणीने तिच्याकडील चाकू हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असता, ती तिच्या अंगावरही धावून गेली. मी घाबरून बेडरूममध्ये गेलो असता तिने बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. मी दरवाजा ठोठावला; परंतु तिने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर ७.४५ वाजेच्या सुमारास काेणीतरी दरवाजा उघडल्याने मी बाहेर आलो, असे आजाेबांच्या तक्रारीत नमूद आहे.

त्यानुसार, पोलिसांनी त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ते अधिक तपास करत आहेत.

.............................