Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्रंक अँड ड्राइव्ह’मुळे आजोबा-नातू दगावले

By admin | Updated: April 5, 2016 02:11 IST

मद्यधुंद चालकाने दिलेल्या धडकेमुळे सार्थक पोलेकर हा पाच वर्षांचा चिमुरडा जागीच ठार झाला तर या अपघातात जखमी झालेल्या भिकू पोलेकर (६२) या त्याच्या आजोबांनी रुग्णालयात अखेरचा श्वास

मुंबई : मद्यधुंद चालकाने दिलेल्या धडकेमुळे सार्थक पोलेकर हा पाच वर्षांचा चिमुरडा जागीच ठार झाला तर या अपघातात जखमी झालेल्या भिकू पोलेकर (६२) या त्याच्या आजोबांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रविवारी रात्री ओशिवारा परिसरात घडलेल्या या अपघात प्रकरणी कारचालकाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. इंद्रजीत नटोजी (४५) असे अटक करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. पोलेकर कुटुंबीय हे मूळचे बोरीवलीच्या गोराई परिसरातील रहिवासी आहेत. या अपघातात सार्थकची आई शिल्पा (२८) यांना मुका मार लागला असून आजी इंदू (५८) या अपघातात थोडक्यात बचावल्या. शिल्पा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी एका कौटुंबिक सोहळ््यानंतर रात्री दहाच्या सुमारास रिक्षा पकडण्यासाठी शिल्पा, सार्थक आणि त्याचे आजी-आजोबा ओशिवरा येथील लिंक रोड परिसरातील आनंदनगर जंक्शन येथे आले. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या एका कारने या सर्वांना जोरात धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता, की सार्थक हा तीन ते चार फूट उंच उडाला आणि पुन्हा कारवर आदळला. स्थानिकांनी त्या तिघांना तातडीने ब्रम्हकुमारी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात सार्थकला तपासल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. भिकू पोलेकर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना कुपर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात झाला त्यावेळी कारचालक इंद्रजीत नटोजी नशेत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यानुसार त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)