Join us

महानायकाने केला पाऊण तास लोकल प्रवास

By admin | Updated: November 16, 2015 02:34 IST

‘रंग बरसे..., ओ साथी रे...’ अशी गाणी गात महानायक अमिताभ बच्चन यांनी आज चक्क सीएसटी ते भांडुप असा तब्बल पाऊण तास लोकल प्रवास केला. या प्रवासाने अमिताभ यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला.

मुंबई : ‘रंग बरसे..., ओ साथी रे...’ अशी गाणी गात महानायक अमिताभ बच्चन यांनी आज चक्क सीएसटी ते भांडुप असा तब्बल पाऊण तास लोकल प्रवास केला. या प्रवासाने अमिताभ यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. महानायकाने लोकलने प्रवास केल्याचे फोटो, व्हिडीओ टिष्ट्वटर आणि व्हॉट्स अ‍ॅपवर पडताच त्याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्या. ‘सुपरमॅनचा ग्रेट प्रवास’ असेही त्यांच्या काही चाहत्यांनी म्हटले. एका वाहिनीवर बिग बी अमिताभ बच्चन यांचा एक शो सुरू आहे. लोकलमध्ये गाणी गाऊन त्यातून जमा होणारा पैसा कॅन्सर रुग्णांना देणाऱ्या ‘लोकल हीरो’ सौरभची भेट घेण्यासाठी बच्चन यांनी हा लोकल प्रवास केला. अमिताभ बच्चन यांनी सकाळी ७.०५ वाजताची सीएसटीहून अंबरनाथला जाणारी धीमी लोकल पकडली आणि सेकंड क्लासच्या डब्यातून सौरव व त्याच्या सहकाऱ्यांसह प्रवासाला सुरुवात केली. बच्चन ज्या डब्यातून प्रवास करीत होते, त्या डब्यात चढणाऱ्या प्रवाशांना मात्र ‘बिग बीं’ना पाहताच धक्का बसत होता. त्यामुळे ठरलेल्या स्थानकांवर उतरण्याऐवजी अनेक प्रवाशांनी प्रवास सुरूच ठेवला. या प्रवासात बच्चन यांनी ‘रंग बरसे..., ओ साथी रे...’ ही गाणी गात लोकल हीरो असलेल्या सौरवला कौतुकाची थाप दिली. बच्चन गात असल्याने प्रवासीही टाळ्या वाजवून आणि गाऊन त्यांना चांगलीच साथ देत होते. पाऊण तासाचा प्रवास केल्यानंतर भांडुप स्थानकात अमिताभ बच्चन उतरले. बच्चन यांचे फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या टिष्ट्वटर अकाउंटवर झळकताच १६ मिनिटांतच ८९ युजर्सकडून ३६४ टिष्ट्वट करण्यात आले.