Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजी आजोबा डेंग्यू - मलेरियाविषयी करणार जनजागृती

By admin | Updated: May 11, 2014 21:49 IST

पावसाळा सुरू झाला की, मुंबईमध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांचा फैलाव होतो, साधे उपाय केले तर हे टाळता येऊ शकते. आता हे कसे शक्य आहे या विषयीची माहिती आजी - आजोबा मुंबईकरांना देणार आहेत.

मुंबई : पावसाळा सुरू झाला की, मुंबईमध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांचा फैलाव होतो, साधे उपाय केले तर हे टाळता येऊ शकते. आता हे कसे शक्य आहे या विषयीची माहिती आजी - आजोबा मुंबईकरांना देणार आहेत. केईएम रूग्णालयाने या आजी - आजोबांना मलेरिया, डेंग्यू विषयी जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणार्‍या फेसकॉम या स्वयंसेवी संस्थेच्या सुमारे १०० आजी - आजोबा या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. काही छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केल्यास घरात होणारी डासांची पैदास थांबवू शकतो. याविषयीचे प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिकांना शुक्रवारी दोन तास देण्यात आले. यावेळी त्यांना परिचारिका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींनी बसवलेले पथनाट्य दाखविण्यात आले, असे केईएम रूग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी दिली. घराची स्वच्छता करताना कुठेही पाणी साचून राहिले नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. फुलदाणी, लकी प्लाण्ट, कुंडी खाली ठेवलेली ताटली, गच्चीवर असलेल्या अडगळीतल्या वस्तू यामध्ये पाणी साचून राहिल्यास डासांची पैदास होते. यामुळे पाणी साठू देऊ नका. पिंपातले पाणी दोन दिवसांनी बदलून टाका. याविषयी त्यांना माहिती देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आपापल्या विभागामध्ये जाऊन जनजागृती करणार आहेत. या पावसाऴ्यात मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ज्येष्ठ नागरिक जनजागृती करणार आहेत, असे शुभांगी पारकर यांनी सांगितले.