Join us  

संकष्टीच्या मुहूर्तावर अंधेरीच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:58 AM

‘अंधेरीचा राजा’चे १९७४ पासून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते.

मुंबई : ‘अंधेरीचा राजा’चे १९७४ पासून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. आझाद नगर मेट्रो रेल्वे स्थानकापासून जवळ असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला सेलिब्रेटींसह गणेश भाविकांनी यंदाही मोठी गर्दी केली होती. मंगळवार, १७ सप्टेंबर रोजी अंगारकी चतुर्थीला अंधेरीच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक निघणार आहे.मंगळवारी सायंकाळी ६ वाजता आझादनगर-२ येथील गणेश मंडपात सजविलेल्या ट्रकमध्ये अंधेरीच्या राजाची मूर्ती ठेवण्यात येईल. त्यानंतर आझाद नगर, अंबोली, अंधेरी मार्केट, एस. व्ही. रोड, जयप्रकाश रोड, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सात बंगला, गंगा भवन मार्गे वेसावे समुद्रकिनारी ती दुसऱ्या दिवशी दुपारी पोहोचेल. तेथे भावे यांच्या कुटुंबीयांनी अंधेरीच्या राजाची पूजा केल्यावर दुपारी दोन वाजता विसर्जन करण्यात येईल.मांडवी गल्ली गणेश विसर्जन मंडळाचे कार्यकर्ते वेसाव्याच्या समुद्रात खास बोटीतून अंधेरीच्या राजाला भावपूर्ण निरोप देतील,अशी माहिती यशोधर फणसे यांनी दिली.सन १९७३ साली येथील आझाद नगरमध्ये राहात असलेले आणि गोल्डन टोबॅको, एक्सल, टाटा स्टील आणि अन्य कारखान्यांतील कर्मचाऱ्यांचे कारखाने बंद पडले होते. आमचे कारखाने लवकर सुरू होऊ देत. आम्ही संकष्टीला विसर्जन करू, असा नवस अंधेरीच्या राजाला त्यांनी केला होता.