Join us

‘ॲप’वरही देता येणार ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचा हिशेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:07 IST

ॲपवरही देता येणार ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचा हिशेब३० दिवसांत हिशेब देणे बंधनकारकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील तब्बल ...

ॲपवरही देता येणार ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचा हिशेब

३० दिवसांत हिशेब देणे बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील तब्बल १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल अलीकडेच लागला. कोणाची सरशी झाली यावरून प्रमुख राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे सुरूच आहेत. दरम्यान, नियमानुसार निवडणुकीतील सर्व उमेदवारांना ३० दिवसांत एकूण खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. प्रचलित पद्धतीसोबतच ‘ट्रू व्होटर’ या मोबाइल ॲपद्वारेही हिशेबाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी दिली.

मदान यांनी सांगितले की, विहित मुदतीत आणि पद्धतीने खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र घोषित करण्यात येते. त्यादृष्टीने उमेदवारांच्या सोयीसाठी राज्य ‍निवडणूक आयोगाने ट्रू व्होटर मोबाइल ॲपद्वारे खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ॲपद्वारे हिशेब सादर करण्याची सुविधा ऐच्छिक स्वरूपाची आहे; परंतु याद्वारे किंवा पारंपरिक पद्धतीने विहित मुदतीत खर्च सादर करणे बंधनकारक आहे.

निवडणूक खर्च सादर करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची सूचना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवर निकाल देताना केली होती. त्यादृष्टीने ट्रू व्होटर मोबाइल ॲप उपयुक्त ठरत आहे. त्याचा वापर २०१७ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. यात निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याबरोबरच मतदार यादीत नाव शोधणे, मतदान केंद्राचे ठिकाण शोधणे, उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती जाणून घेणे, आदी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. निवडणुकांशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मतदार यादी बनविणे, मतदान केंद्रांचा नकाशा तयार करणे, महत्त्वाचे अहवाल सादर करणे, मतदानाची आकडेवारी देणे आदी सुविधा आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका लढविलेल्या ८० हजार उमेदवारांनीही हे ॲप डाऊनलोड केले, असेही मदान यांनी सांगितले.

..........................