Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन्नपूर्णा योजनेतील धान्य मिळावे

By admin | Updated: May 15, 2014 00:26 IST

नाईलाजास्तव एपीएल रेशन कार्डामधून विभक्त रेशनकार्ड करून घेणार्‍या केशरी कार्डधारकांना शासनाच्या अन्नपूर्णा योजनेतील धान्य मिळावे, अशी मागणी आदिवासी महिलांनी पुरवठा विभागाकडे केली आहे़

विक्रमगड : घरातील सदस्यांच्या संख्येत वाढ झाल्याने नाईलाजास्तव एपीएल रेशन कार्डामधून विभक्त रेशनकार्ड करून घेणार्‍या केशरी कार्डधारकांना शासनाच्या अन्नपूर्णा योजनेतील धान्य मिळावे, अशी मागणी आदिवासी महिलांनी पुरवठा विभागाकडे केली आहे़ गेल्या कित्येक वर्षापासून दारिद्रय रेषेखालील कातकरी व इतर आदिवासी लाभार्थ्यांना अंत्योदयचे पिवळे कार्ड देऊन त्यावर दोन रुपये किलो दराने तांदुळ व तीन रूपये किलो दराने गहू असे पस्तीस किलो धान्य सरकारी रेशन दुकानावर मिळत असते़ मात्र कालांतराने कुटुंबातील सदस्यांत वाढ होत आहे. तशी रेशनकार्डमध्ये सदस्यांच्या संख्येत वाढ होत गेली़ त्यामुळे महिन्याला पस्तीस किलो धान्य मोठया कुटुंबाला पुरत नाही. घरातील एकत्र कुटुंब पध्दती सोडून विभक्त राहू लागले व रेशनवरील धान्य मिळविण्यासाठी अडचण भासू लागली.त्यामुळे अंत्योदयच्या पिवळया रेशन कार्डामधून विभक्त रेशन कार्ड काढण्यासाठी लोकांची गर्दी तहसिलदार कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे वाढू लागली़ मात्र अंत्योदय योजनेचा लाभ केवळ मुळ शिधापत्रिकाधारकांनाच मिळत असल्याचा शासकीय नियम असल्याने कुटुंबातून विभक्त रेशनकार्ड करून घेणार्‍यांना केशरी रेशनकार्ड मिळू लागले. या केशरी कार्डधारकांना रेशनकार्डवर सध्या कोणत्याही प्रकारचे धान्य मिळत नसल्याने या कुटुंबांना खुल्या बाजारातील महागाचे धान्य खरेदी करून मुलांच्या पोटात दोन घास भरविण्याची वेळ कुटुंबावर आली. या केशरी रेशनकार्ड धारकांना शासनाच्या अन्नपूर्णा योजनेतील धान्य मिळावे़ अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)