मनोहर कुंभेजकर, मुंबई: मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरातील कांदळवन क्षेत्रावर डेब्रिज टाकून सुरू असलेल्या अतिक्रमणावर आता पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी मार्वे टी जंक्शन येथे कायमस्वरुपी निरीक्षण चौकी आणि सीसीटीव्ही यंत्रणा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या पाठपुराव्याने डेब्रिज माफियांवर करडी नजर ठेवण्यासाठी निरीक्षण चौकी व सीसीटीव्हीचा 'क्लोज वॉच' असणार आहे. यासाठी विशेष मोहिम राबवली जाणार आहे.
मालवणी परिसरात सुमारे ८ हेक्टर (८०,००० चौरस मीटर) एवढ्या विस्तृत कांदळवन क्षेत्रात काही गटांकडून भूगोलिक रचनेमध्ये कृत्रिम बदल करून अनधिकृत झोपड्या उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कांदळवने तोडून त्याठिकाणी डेब्रिज टाकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले असून, यावर तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली होती.
या अतिक्रमणाच्या विरोधात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मढ-मार्वे टी जंक्शन येथे वाहतूक थांबवण्यासाठी निरीक्षण चौकी उभारण्याची आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची मागणी पालिकेकडे केली होती. या मागणीनंतर पालिका आणि वनविभागाने संयुक्तरीत्या ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी बोरिवली पश्चिमेकडील एमएचबी कॉलनी आणि एक्सर परिसरात डेब्रिज माफियांवर वनविभागाने यशस्वी कारवाई केली होती. त्याच धर्तीवर मालवणी परिसरातही व्यापक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सॅटेलाईट इमेजिंग आणि मॅपिंगच्या माध्यमातून नियमितपणे अतिक्रमणाची माहिती गोळा केली जात आहे. ही माहिती संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून आवश्यक ती कारवाई केली जात आहे. कांदळवनांचे सर्वेक्षण करून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण कसे करता येईल, यासाठी प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या भागात होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी केंद्रीय पातळीवर घेतलेली ही मोहीम निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे, अशी आशा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केली आहे.
कांदळवनावर डेब्रिज टाकून थाटले लग्न मंडप
मालवणी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरु असून, विशेषतः कांदळवनाच्या जागेवर डेब्रिजचा भराव टाकून लग्नाचे मंडप उभारले जात आहेत. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, सुमारे सात मंडप बेकायदेशीरपणे उभारण्यात आले असून, हे मंडप ६० ते ७० हजार रुपयांच्या भाड्याने इव्हेंटसाठी उपलब्ध करून दिले जातात.
या अतिक्रमणामुळे परिसरातील नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, सार्वजनिक सुरक्षिततेवरही मोठा धोका निर्माण झाला आहे.प्रशासनाने मालवणी परिसरातील अनधिकृत मंडपांवर त्वरित कारवाई करून ही जागा मोकळी करावी, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ पर्यावरण मिळू शकेल.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या संदर्भात तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.