Join us  

गिर्यारोहकांचे पथक होणार गोविंदांचे सुरक्षाकवच, वरच्या थरातील गोविंदाला संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 5:56 AM

ज्येष्ठ गिर्यारोहक रत्नाकर कपिलेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभादेवी येथील महेश सावंत यांच्या दहीहंडी आयोजनाखाली आणि ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठानच्या उत्सवात ही पथके सामील होणार आहेत.

मुंबई : दहीहंडी उत्सवात सर्वांत वरच्या थराला चढणाऱ्या गोविंदाला सुरक्षा मिळावी म्हणून गिर्यारोहकांचे पथक आता सुरक्षाकवच देणार आहे. दहीहंडीच्या थरांच्या निर्बंधाचा वाद पाहून या उत्सवात गोविंदांच्या खांद्याला खांदा देत गिर्यारोहक पथके पुढे आली असून आता हा उत्सव अधिकाधिक सुरक्षित होऊ लागला आहे. यंदाही दोन आयोजकांच्या ठिकाणी गिर्यारोहक पथके सुरक्षा देण्यासाठी सज्ज झाली आहेत.ज्येष्ठ गिर्यारोहक रत्नाकर कपिलेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभादेवी येथील महेश सावंत यांच्या दहीहंडी आयोजनाखाली आणि ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठानच्या उत्सवात ही पथके सामील होणार आहेत. या ठिकाणी गोविंदांना गिर्यारोहणाच्या बिले तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. या सुरक्षाकवचांचा मुख्य उद्देश म्हणजे गोविंदांचे थर लागत असताना थर कोसळला तरी वरच्या थरातील गोविंदा थेट खाली न कोसळता त्याला गिर्यारोहकांच्या साहाय्याने, बिले तंत्राचा वापर करून वरच्या वर उचलून धरता येते. त्यामुळे या गोविंदांचे अपघात कमी होऊन त्यांना दहीहंडी सुरक्षितपणे खेळता येते.याविषयी ज्येष्ठ गिर्यारोहक रत्नाकर कपिलेश्वर यांनी सांगितले, कोणतेही साहस करताना योग्य ती सुरक्षा घेणे यात काहीच गैर नाही. याउलट त्या साहसाचा आनंद घेण्यासाठी सुखरूप राहणे आवश्यक आहे. त्यामुळे २०११ सालापासून गिर्यारोहणातील अनुभवावरून ही कल्पना अंमलात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आयोजकांनी संवाद-समन्वय साधून प्रत्येक ठिकाणी या तंत्राचा वापर करण्यासाठी आम्ही आग्रही असतो, जेणेकरून या उत्सवात अपघातांचे प्रमाण कमी व्हावे.

टॅग्स :मुंबई