Join us

गोविंदांना अखेर अडीच लाखांचे विमाकवच!

By admin | Updated: July 29, 2016 03:42 IST

थरांचे विक्रम रचण्यासाठी गोविंदा पथके कसून सराव करीत आहेत. त्यामुळे उत्सवातील अपघात टाळण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीने विमा कंपनीकडे गोविंदांच्या विम्याबाबत विविध मागण्या

मुंबई : थरांचे विक्रम रचण्यासाठी गोविंदा पथके कसून सराव करीत आहेत. त्यामुळे उत्सवातील अपघात टाळण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीने विमा कंपनीकडे गोविंदांच्या विम्याबाबत विविध मागण्या केल्या होत्या. त्यानंतर, समन्वय समितीच्या पाठपुराव्यानंतर अखेर विमा कंपनीने गोविंदांचे विमाकवच अडीच लाखांचे केले आहे.दहीहंडी उत्सवाच्या काळात होणारे अपघात टाळण्यासाठी समन्वय समितीने ‘शून्य अपघात’ लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी सुरक्षेपासून विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या उत्सवाच्या काळात दहीहंडी पथकांचा शिवाय प्रत्येक गोविंदाचा विमा काढण्यात येतो. गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी पथकातील प्रत्येक खेळाडूमागे ३० रुपये जमा करून उपचार खर्च १५ हजार रुपये आणि विमाकवच दीड लाख रुपयांचे असे त्याचे स्वरूप होते. विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर यंदापासून उपचार खर्च २५ हजार रुपयांचा आणि विमाकवच अडीच लाख रुपयांचे करण्यात आले आहे. यात प्रत्येक खेळाडूच्या खर्चात १० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे ‘अर्थकारण’चे गणित जुळविताना कसरत करणाऱ्या गोविंदा पथकांना अधिकचा भुर्दंड पडणार आहे. या विम्याची नुकसानभरपाई गुरुपौर्णिमा अथवा विमा प्रीमियम भरल्यापासून ते २६ आॅगस्ट पहाटे ६ वाजेपर्यंत असणार आहे.दहीहंडी समन्वय समितीची विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत गुरुवारी अंतिम बैठक झाली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या वेळी विमा कंपनीचे सहायक प्रबंधक सचिन खानविलकर यांनी सांगितले की, ‘दहीहंडी उत्सवातील धोका व जोखीम विचारात घेऊन गोविंदा पथकात भाग घेणाऱ्या गोविंदांना विम्याचे संरक्षण देण्यात येते. यात काळानुरूप बदल करण्याची मागणी समितीने केली होती. या पार्श्वभूमीवर काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.’ (प्रतिनिधी)