लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे सावट यंदाच्या दहीहंडी उत्सवावरदेखील कायम असल्यामुळे सरकारने यंदा दहीहंडी उत्सवावर निर्बंध घातले होते. त्यामुळे मुंबईत सर्व ठिकाणी दहीहंडी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. तर अनेक गोविंदा पथकांनी सामाजिक उपक्रमांवर भर दिल्याचे संपूर्ण मुंबापुरीत चित्र होते.
कोराेनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधांमुळे मुंबईतील रस्त्यावर दरवर्षी मानवी थर रचणारे गोविंदा यंदा मात्र दिसले नाहीत. सर्व गोविंदा पथक दरवर्षी आपल्या पथकाचे टी-शर्ट घालून बस, टेम्पो, ट्रक व दुचाकीवरून मानवी थर रचण्यास घराबाहेर पडलेले पाहायला मिळतात. मात्र यंदा या गोविंदांनी स्वयंशिस्त राखत आपल्या घरीच राहणे पसंत केले. दहीहंडीवर निर्बंध असले तरीदेखील यंदा गोविंदांचा उत्साह मात्र दरवर्षीप्रमाणेच होता. यावेळी मुंबईतील अनेक गोविंदा पथकांनी जागेवाल्याची पूजा करत व सामाजिक अंतर राखत उत्सव साजरा केला. काही ठिकाणी परंपरा खंडित होऊ नये म्हणून एक ते दोन थरांवर दहीहंडी फोडण्यात आली.
मुंबईतील अनेक गोविंदा पथकांनी मंगळवारी रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले होते. मुंबईतील दृष्टिहीन मुलांचे पहिले गोविंदा पथक असलेल्या नयन फाऊंडेशनच्या गोविंदांनी माटुंगा येथील रुईया महाविद्यालयासमोर असणाऱ्या मैदानात जागेवाल्याला नारळ देत गाऱ्हाणे घातले आणि पुढच्या वर्षी अधिक उत्साहात गोपालकाला उत्सव साजरा करू, असे सांगितले. यावेळी पथकातील दृष्टिहीन बांधवांना संस्थेच्या वतीने अन्नधान्य साहित्य वाटप करण्यात आले. दादर आणि वरळी येथील बीडीडी चाळींमध्ये देखील काही मंडळांनी छोट्या स्वरूपात गोपालकाला उत्सव साजरा केला.
मुंबईत जांभोरी मैदान, गिरगाव, परळ, घाटकोपर, चेंबूर नाका, दादर आयडियल गल्ली, शिवाजी पार्क, बोरिवली, अंधेरी, वांद्रे, मानखुर्द या ठिकाणी मोठ्या दहीहंडी याचे आयोजन करण्यात येते, त्यामुळे येथे पाय ठेवायलाही जागा नसते. मात्र मंगळवारी या सर्व परिसरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. यंदा मोठ्या दहीहंडी आयोजित न केल्याने मंडप डेकोरेटर्स, साऊंड सिस्टिम, डान्स ग्रुप, ऑर्केस्ट्रा, अँकर, टी-शर्ट व्यवसाय, बस, टेम्पो व्यवसाय या सर्वांचे उत्पन्न बुडण्याची खंत या व्यावसायिकांनी व्यक्त केली.