Join us

शॉवरच्या पाण्याने गोविंदा भिजले!

By admin | Updated: August 19, 2014 02:10 IST

सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निर्णयामुळे बंधनमुक्त झालेल्या दहीहंडी उत्सवाकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिले होते.

मुंबई : सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निर्णयामुळे बंधनमुक्त झालेल्या दहीहंडी उत्सवाकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे हा उत्सव साजरा करण्यासाठी गोविंदा पथके आणि आयोजकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत होती. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच मुंबईवर पावसाची संततधार सुरू झाली आणि हीच रिपरिप कायम राहील, अशी अपेक्षा गोविंदा पथकांना होती. मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे गोविंदांना शॉवरच्या पाण्यातच भिजूनही त्यांचा उत्साह कायम दिसून आला.
सकाळी जागेवाल्यांची हंडी फोडून ठिकठिकाणांहून पारंपरिक वाद्यांच्या गजरात गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यास प्रारंभ केला. दुपारी अकरानंतर पावसाने विश्रंती घेतली आणि हंडी फोडण्यासह भिजण्यासाठी आतुर झालेला गोविंदा दिवसभर कोरडा राहिला. दहीहंडी उत्सवात पावसाने दांडी मारून गोविंदांच्या उत्साहावर विरजणच घातले. मात्र पावसाची हीच उणीव गोविंदांना भासू नये म्हणून दादर, वरळी, घाटकोपर, लालबाग, माहीम, शिवाजी पार्क, माझगाव, लव्ह लेन अशा सर्वच आयोजनांमध्ये शॉवरची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक आयोजनात सलामी दिल्यानंतर शॉवरचा किमान 15 मिनिटे आस्वाद घेऊन गोविंदांनी डीजेच्या तालावर पाय थिरकवले.  
मध्य आणि दक्षिण मुंबईसह पूर्व-पश्चिम उपनगरांतील हंडी आयोजकांच्या ठिकाणी गोविंदा पथकांसह बघ्यांनीही गर्दी केली होती. या वेळी पथकांनी दिलेल्या 
यशस्वी सलामीनंतर डीजेच्या तालावर शॉवरने चिंब भिजत गोविंदांसह या बघ्यांनी बिनधास्त नाचत आपली 
हौस भागवली. दुपारनंतर मात्र या गोविंदा पथकांनी ठाण्याकडील 
बडय़ा आयोजकांमध्ये मोर्चा वळविला. (प्रतिनिधी)