Join us  

स्टार प्रचारक म्हणून गोविंदा करणार महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार 

By मनोहर कुंभेजकर | Published: April 01, 2024 7:00 PM

बॉलीवूडचा सुपरस्टार गोविंदा याने दि,28 मार्च रोजी वर्षा येथे  शिंदे सेनेत प्रवेश केला.

मुंबई: बॉलीवूडचा सुपरस्टार गोविंदा याने दि,28 मार्च रोजी वर्षा येथे  शिंदे सेनेत प्रवेश केला. उत्तर पश्चिम लोकसभेचे ठाकरे सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात गोविंदाची लढत  होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती.तर अलीकडेच वर्षा वर झालेल्या उत्तर पश्चिम मुंबईच्या शिंदे सेनेच्या 17 माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती.त्यावेळी आम्हाला कोणी सेलिब्रेटी नको,पण आम्हाला येथून  मराठी उमेदवार द्या अशी विनंती केली होती. या माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत दि,10 मार्च रोजी उद्धव सेनेची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश करणारे जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी द्यावी अशी सूचना त्यांनी केली होती.मात्र त्यांनी येथून लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘गोविंदा यांनी निवडणुकीत दाऊदची मदत घेतली होती, या माझ्या आरोपावर मी आजही ठाम आहे,’ असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केल्याने नव्याने वाद सुरू झाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर शिंदे सेनेच्या व महायुतीच्या  उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी दिली आहे.त्यामुळे आता ते स्टार प्रचारक म्हणून महायुतीच्या  उमेदवारांचा प्रचार करतील असे आता स्पष्ट झाले आहे.

लोकसभेच्या पहिल्या टप्यातील शिंदे सेनेच्या उमेदवारांचा ते प्रचार करतील.पहिल्या टप्यात दि,19 मे रोजी रामटेक, भंडारा,गोंदिया,गडचिरोली, चंद्रपूर येथील लोकसभेच्या निवडणुका होणार आहे.गोविंदा हे दि,4,5 व 6 मे रोजी रामटेक मतदार संघात,दि,11 व दि,12 मे रोजी यवतमाळ मतदार संघात, दि,15 व दि,16 एप्रिल रोजी हिंगोली मतदार संघात आणि दि,17 व दि,18 मे रोजी बुलढाणा मतदार संघात ते प्रचार करतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :मुंबईगोविंदालोकसभा निवडणूक २०२४