Join us  

राज्यपाल कोश्यारींच्या पदमुक्तीची दिवसभर चर्चा, राजभवनने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 8:59 AM

राजभवनाकडून इन्कार; म्हणाले, तथ्य नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत असताना राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची चर्चा सोमवार दिवसभर होती. मात्र, या चर्चेत तथ्य नसल्याचे राजभवनच्या सूत्रांनी स्पष्ट केले.राज्यपाल कोश्यारी यांनी यापूर्वी सावित्रीबाई फुलेंबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. विरोधी पक्षांनी त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे केली आहे. 

छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांनीही राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 

राज्यपालांच्या वक्तव्याचे राज्य मंत्रिमंडळातील कुणीही समर्थन केलेले नाही. आम्ही त्याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली. राज्यपालांनी सुधारणा करणे उचित ठरेल. - शंभूराज देसाई, उत्पादन शुल्क मंत्री

खासदार उदयनराजे यांना अश्रू अनावरपुणे : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून, खासदार उदयनराजे भोसले येत्या ३ डिसेंबरला रायगडावर जनआक्रोश मेळावा घेणार आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाकडून अवमानाची दखल घेतली जात नसेल तर त्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला. उद्वेगातून उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना ३ डिसेंबरनंतर भेटून गाऱ्हाणे मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

टॅग्स :भगत सिंह कोश्यारीमुंबई