Join us

प्रजासत्ताक दिन शिबिरातील यशस्वी कॅडेट्सचा राज्यपालांकडून सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST

(फोटो मेल केले आहेत.)लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यापीठांचे कुलपती या नात्याने आपण उपस्थित राहत असलेल्या दीक्षान्त समारंभांमध्ये ...

(फोटो मेल केले आहेत.)

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विद्यापीठांचे कुलपती या नात्याने आपण उपस्थित राहत असलेल्या दीक्षान्त समारंभांमध्ये बहुतांशी सुवर्ण पदके महिला विद्यार्थिनी जिंकत असतात. एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये राज्याच्या दहापैकी दहाही महिला कॅडेट्सची प्रतिष्ठेच्या संचलनासाठी झालेली निवड ही तितकीच अभिमानास्पद कामगिरी असल्याचे सांगून महिलांच्या कामगिरीचा सर्वच क्षेत्रांमध्ये उंचावणारा आलेख देशाकरिता शुभ लक्षण आहे, असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी काढले. नवी दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राज्याची मान उंचावल्याबद्दल राज्यातील एनसीसी कॅडेट्सना राज्यपालांनी राजभवन येथे निमंत्रित करून सन्मानित केले, त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी तसेच सेनादलांचे अधिकारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. भारतीय सैन्य दलांबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचे स्थान आहे. दुर्गम ठिकाणी देशाच्या रक्षणासाठी आपली सैन्यदले सज्ज आहेत. एनसीसीच्या विद्यार्थ्यांना देशसेवा, शिस्त व सर्वधर्मसमभावाचे संस्कार मिळत असतात. त्यामुळे भविष्यात जीवनात कुठल्याही क्षेत्रात कार्य करीत असले तरीही विद्यार्थ्यांनी शिस्तीचे संस्कार कायम ठेवावेत, अशी सूचना राज्यपालांनी या वेळी केली.

राज्यातील २६ एनसीसी कॅडेट्सपैकी २४ कॅडेट्सची राजपथ संचलनासाठी निवड झाली तसेच महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला द्वितीय सर्वोत्तम संचालनालयाचा खिताब मिळाल्याचे मे. जन. खंडुरी यांनी सांगितले. राज्यपालांच्या हस्ते कॅडेट आयुषी गजानन नागपूरकर, ज्योती रुकवल, नाजुका कुसराम, मनदीपसिंग सिलेदार, अमोद माळवी, रामचंद्र अशोक चव्हाण, सोहम रोहडे व मयूर मंदेसिया या कॅडेट्सचा सत्कार करण्यात आला.