मुंबई– राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी धर्मदाय रुग्णालयांमधील गैरप्रकारांवर तीव्र संताप व्यक्त केला असून सरकारच्या दुर्लक्षाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रभर असंख्य हॉस्पिटल्स धर्मदाय संस्था म्हणून नोंदणी करून घेतात, मात्र प्रत्यक्षात गरिबांना तिथे योग्य वैद्यकीय सेवा मिळत नाही. पुण्यात काल घडलेली घटना ही काही पहिली नाही, अशा अनेक घटना यापूर्वी मुंबई आणि इतर शहरांमध्ये घडल्या आहेत. धर्मदाय रुग्णालयांच्या नावाखाली गरीब रुग्णांची लूट होत आहे आणि त्यांच्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
या हॉस्पिटल्सकडून शासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली केली जाते. गरिबांसाठी राखीव असलेल्या खाटांवर श्रीमंतांना भरमसाठ फी घेऊन दाखल केले जाते. मोफत किंवा माफक दरात उपचार द्यायचे सोडून, प्रशासन आणि हॉस्पिटल मालक मिळून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
शासन या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असून धर्मदाय रुग्णालयांवर कोणताही प्रभावी नियंत्रण यंत्रणा नाही. सदर रुग्णालये मनमानी कारभार करून गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर जनतेचा विश्वास उडाला असल्याची टिका त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने संबंधित हॉस्पिटल्सवर तात्काळ कारवाई करावी, गरिबांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल यासाठी शासनाने कडक उपाययोजना कराव्यात. अन्यथा, पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि सरकारला उत्तर देण्यास भाग पाडेल असा इशारा मातेले यांनी दिला.