चेतन ननावरे, मुंबईशासनाच्या वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांनी मॉडेल अॅप्रुव्हल प्रमाणपत्र नसलेल्या आणि स्टॅम्पिंग चुकवलेल्या सीएनजी पंपांवर बंदीची कठोर कारवाई केल्यानंतर आॅइल कंपन्यांनी शासनासमोर शरणागती पत्करली आहे. बुडवलेल्या शासन महसुलाच्या बदल्यात ठरावीक दंड भरून शासनाने बंद केलेले सीएनजी पंप पुन्हा सुरू करण्याचा तोडगा गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर काढल्याचा दावा पेट्रोलपंप डीलर्स असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष रवी शिंदे यांनी केला आहे. प्रशासनाने सुरुवातीला १२ सीएनजी पंप सील केल्याने इतर पंपांवरील ताण वाढला होता. परिणामी शहरासह उपनगरांतील प्रत्येक सीएनजी पंपाबाहेर अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. त्यानंतर पेट्रोलपंप डीलर्सच्या संघटनेने पंप सील न करण्याची विनंती करत महिन्याभराची मुदत मागितली होती. त्यात एक महिन्याची वाढही केली.दरम्यान, झालेल्या बैठकांनंतर ठरावीक दंड आकारून स्टॅम्पिंग करून पंप पुन्हा सुरू करण्याचा तोडगा काढण्यात आला होता. मात्र लाखोंच्या दंडाची रक्कम डीलर्सने भरायची की आॅइल कंपन्यांनी, यावर घोडे अडले होते. डीलर्स आणि आॅइल कंपन्यांमध्ये झालेल्या चर्चेअंती करारानुसार दंडाची रक्कम आॅइल कंपन्यांनी भरण्याचे मान्य केल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आज नियंत्रकांची भेट घेऊन संघटनेने दंड भरण्याची तयारी दर्शवली.
शासनासमोर आॅइल कंपन्या झुकल्या!
By admin | Updated: December 19, 2014 01:22 IST