Join us

जुन्या नोटांतून शासकीय करभरणा!

By admin | Updated: November 11, 2016 04:56 IST

महावितरणसह राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांकडील देणी वा करांचा भरणा ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या चलनी नोटांद्वारे ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत करता येईल

मुंबई : महावितरणसह राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांकडील देणी वा करांचा भरणा ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या चलनी नोटांद्वारे ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत करता येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने आज जाहीर केले. ही मुदत आणखी काही दिवस वाढवून दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून या संदर्भात विनंती केली होती. नगरपालिका, महारपालिका, ग्रामपंचायती तसेच राज्य शासनाच्या मालकीची मंडळे, महामंडळे यांची कर्जे तसेच विविध कर यांचा भरणा करण्यासाठी जुन्या रद्द करण्यात आलेल्या चलनी नोटा स्वीकारण्याची परवानगी दिल्यास नागरिकांची मोठी सोय होणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणले होते. त्यानुसार केंद्र शासनाने तात्काळ निर्णय घेऊन अशी मुभा दिली आहे. केंद्राने परवानगी दिल्याप्रमाणे ज्यांच्या नावे ही देणी आहेत, त्यांना रुपये ५०० आणि एक हजार रुपयांच्या रद्द करण्यात आलेल्या चलनी नोटा भरता येईल. शिवाय, त्रयस्थ व्यक्तीही अधिकारपत्रे घेऊन कर्जदाराच्या नावे रक्कम चुकती करु शकतील. त्यासाठी महावितरणसह सर्व कर/ बिल भरणा केंद्रे ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहतील. (विशेष प्रतिनिधी)