लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहत असून, या आदिवासी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनातर्फे मुंबईत एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले आहे. परंतु, मागील कित्येक वर्षांपासून हे कार्यालय बोरीवली पूर्व येथील महापालिकेच्या शाळेत भाडेतत्त्वावर सुरू आहे. या कार्यालयासाठी आता शासनाने कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुंबईतील आदिवासी समाजातर्फे जोर धरू लागली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मुंबई विभागीय आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील कुमरे म्हणाले, शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या एकात्मिक आदिवासी कार्यालयामार्फत आदिवासी जनतेकरिता अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. म्हणूनच मुंबईत राहणाऱ्या आदिवासी जनतेला हे कार्यालय अत्यंत उपयोगी ठरत आहे.
परंतु, गेली कित्येक वर्षे हे कार्यालय बोरिवली येथील महापालिका शाळेत भाडेतत्त्वावर सुरू आहे. त्यामुळे मुंबई विभागीय आदिवासी काँग्रेसने, मुंबईतील सर्व आदिवासी जनतेच्या वतीने पर्यावरणमंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांना मुंबईतील आदिवासी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासाठी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या अधिपत्याखाली कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली आहे. सदर मागणीचे पत्र मुंबई विभागीय आदिवासी काँग्रेसतर्फे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे तसेच आदिवासी मंत्री पाडवी यांना पाठवल्याचे सुनील कुमरे यांनी सांगितले.