Join us  

माहिती आयोगातील सचिवांच्या नियुक्तीस शासनाने मान्यता नाकारली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 5:38 AM

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक यांनी १ नोव्हेंबर २०१९ रोजी बिजूर यांची आयोगात नियुक्ती केली होती. 

मुंबई : येथील  राज्य मुख्य माहिती आयुक्त कार्यालयाचे सचिव शैलेश बिजूर यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यास सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. तसेच बिजूर यांना कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय व वित्तीय अधिकार प्रदान करता कामा नये, असा अभिप्राय विभागाने दिला आहे. बिजूर हे राज्य शासनाच्या सेवेतून उपसचिव म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्यांची माहिती आयोगात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. कंत्राटी पद्धतीने झालेल्या या नियुक्तीस सामान्य प्रशासन विभागाच्या कार्योत्तर मान्यतेसाठी आयोगाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक यांनी १ नोव्हेंबर २०१९ रोजी बिजूर यांची आयोगात नियुक्ती केली होती. आयोगातील सचिव हे पद हे नियमित स्वरुपाचे आहे. अशा पदावर सेवानिवृत्त अधिकाऱ्याची करार पद्धतीने नियुक्ती करता येत नाही, असे सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले आहे.  मुख्य सचिव पदावर राहिलेल्या सुमित मलिक यांनी मुख्य माहिती आयुक्त या नात्याने बिजूर यांची सचिव म्हणून केलेली नियुक्ती वादाच्या भोवºयात सापडली आहे. खुद्द सामान्य प्रशासन विभागानेच बिजूर यांच्या नियुक्तीतील उणिवांवर बोट ठेवले आहे.

 

टॅग्स :सरकारमहाराष्ट्र सरकार