Join us

पाणीसाठ्यात सरकारी घोळ

By admin | Updated: May 8, 2015 00:07 IST

रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मात्र त्याचवेळी रायगडचे जिल्हाधिकारी यांनी तो ४० टक्के असल्याची माहिती लोकशाहीदिनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे नेमका किती पाणीसाठा शिल्लक आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यात पाणीसमस्येने उग्ररूप धारण केले असून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. लोकशाहीदिनी जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांना पाणीसमस्येवर प्रश्न विचारला असता, जिल्ह्यातील धरणांमध्ये ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे २१ टँकरने १५३ ठिकाणी पाणीपुरवठा केला जात असून पाणीसमस्येवर उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील धरणांमध्ये ४० टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना पाटबंधारे विभागाने दिली असणार, कारण तो विषय त्यांच्या खात्याशी निगडित आहे.मात्र पाटबंधारे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणीसाठ्याची आकडेवारी पाहता, जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित विभागाने चुकीची माहिती दिली असावी अथवा योग्य माहिती न घेताच त्यांनी पत्रकार परिषदेत चुकीची माहिती दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाटबंधारे विभागाकडून दर सात दिवसांनी धरणातील पाणीसाठ्याची माहिती संकलित करून साप्ताहिक अहवाल तयार केला जातो. पाटबंधारे विभागाकडून १८ एप्रिल रोजी देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार धरणात ३६ टक्के पाणीसाठा होता. मात्र दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने २ मे रोजी हाच पाणीसाठा २८ टक्के एवढा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या ताज्या आकडेवारीवरून समजते. याबाबत जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्याशी संपर्क साधला असता, ते कामानिमित्त मंत्रालयात गेल्याचे सांगण्यात आले.