Join us  

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी सरकारने दिले १०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 5:20 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दादरमधील महापौर बंगल्यात स्मारक उभारण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दादरमधील महापौर बंगल्यात स्मारक उभारण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आला.स्मारक उभारणीसाठी मुंबई पालिकेकडून स्मारक संस्थेला महापौर बंगल्याची जागा भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. त्याची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी बाळासाहेबांच्या जयंती दिनी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करतील.भाजपा आणि शिवसेना या दोन मित्र पक्षांचे संबंध कमालीचे ताणले गेले असताना बुधवारी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे हे दोन नेते एकत्र येत आहेत. महापौर बंगल्यात सकाळी ११ ला हा समारंभ होईल. स्मारक दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या स्मारकासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बंगला आधीच खाली केला असून ते राणीच्या बागेतील नव्या महापौर निवासात राहायला गेले आहेत.उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी पत्रकारांना सांगितले की, स्मारक उभारणीचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून केले जाईल. तेच निविदा काढतील. आधी एमएमआरडीएच स्मारकासाठी १०० कोटी रुपये खर्च करेल आणि नंतर राज्य शासन या खर्चाची प्रतिपूर्ती करेल. या स्मारकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल आधीच तयार करण्यात आला आहे.>माध्यमांना समारंभाचे निमंत्रण नाहीबाळासाहेबांच्या जयंती दिनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. भाजपा-शिवसेनेतील लोकसभा निवडणूक युतीची कोंडी अजूनही कायम आहे. त्यामुळे याबाबत हे नेते काय बोलतात, याबाबत उत्सुकता आहे. तथापि, या समारंभासाठी माध्यमांना निमंत्रण देण्यात आलेले नाही.