Join us  

गोरेगाव प्रवासी संघाच्या कबूतर हटाव मोहिमेला मिळाले अखेर यश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 6:10 PM

नागरिकांना सदर परिसरात कबुतराना धान्य घालणे हे कोरोनाच्या साथीत कसे घातक आहे ते समजावून सांगितले

मनोहर कुंभेजकर

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी असणारे व मानवी आरोग्यास धोका पोहचविणारे आणि अस्वच्छता करणारे उघड्यावरील कबूतरखाने अश्या प्रकारच्या रुग्णांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढीस लागण्यास कारणीभूत ठरत आहे. आतापर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये अस्थमाच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनधिकृत कबूतर हटाव मोहिमेला पश्चिम उपनगरात गोरेगावात यश मिळाल्याचे चित्र आहे. गोरेगाव ( पूर्व ) डीपी रोड वरील कबूतर हटाव या मोहिमेला गोरेगाव प्रवासी संघाच्या सुमारे तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर हे यश मिळाले आहे. 

येथील डीपी रोड वर कबुतरांना धान्य घालून, डीपी रोड परिसरात येजा करणारे नागरिक तसेचआजूबाजूच्या परिसरात राहणारे रहिवासी व नागरिकांना, हवेत उडणारी कबुतरांची पिसे व  पंखांवरील जंतूं तसेच त्यांच्या विष्ठेमुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन गोरेगाव प्रवासी संघाच्या सभासदांनी येथील प्रभाग क्रमांक 54च्या स्थानिक नगरसेविका  साधना माने यांना या नागरी समस्येत  लक्ष घालावे अशी विनंती केली होती . या विनंतीला प्रतिसाद देत त्यांनी  नुकतीच सदर परिसराला भेट दिली . यावेळी उपस्थित असलेल्या मनपा कर्मचार्‍यांना रस्त्यावर ओतलेले धान्य गोळा करण्याचे आदेश त्यांनी दिले व आपल्या उपस्थितीत त्या जागेची साफसफाई करून घेतली. व अश्या तर्‍हेने रोज या जागेवर पडलेले धान्य गोळा करण्याबाबत सूचना दिल्या तसेच सदर जागेवर धान्य टाकण्यास बंदी असलेला मनपाचा फलक लावून घेतला .उपस्थित नागरिकांना सदर परिसरात कबुतराना धान्य घालणे हे कोरोनाच्या साथीत कसे घातक आहे ते समजावून सांगितले व सर्व नागरिकांनी या कबुतर हटाव मोहिमेला सहाय्य करावे असे आवाहन नगरसेविका साधना माने यांनी यावेळी केले.

गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष  उदय चितळे व  राजन सावे यांनी सदर जागी कबुतरांसाठी धान्य विकणार्‍या महिलेची पोलिस तक्रार  केल्याची व  तिच्याबाबत एफ आय आर केल्याबाबत माहिती  साधना माने यांना दिली . गेली तीन महिने गोरेगाव प्रवासी संघाने येथील अवैध कबुतरखाना  हटवण्यासाठी सातत्याने पालिकेच्या पी दक्षिण वॉर्ड व वनराई पोलिस ठाण्याकडे पाठपुरावा केला होता.तर वॉट्स अप ग्रुप वरून देखिल गेली तीन महिने सर्व सभासदांनी या चळवळीला उस्फूर्त प्रतिसाद दिला अशी माहिती उदय चितळे यांनी लोकमतला दिली. तर या कबुतर हटाव मोहिमेला मी नगरसेविका म्हणून नागरिकांच्या बाजूने कायम उभी राहीन असे साधना माने यांनी सर्व नागरिकांना आश्वस्त केले. या प्रसंगी  सुधाकर देसाई , हेमा चौधरी यांनी पाठपुरावा केला याबद्दल गोरेगाव प्रवासी संघाचे कार्यकारिणी सदस्य  पराग चुरी यांनी त्यांचे  व उपस्थितांचे आभार मानले .

फुफ्फुसांच्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या अस्थमा रुग्णांना कबूतरांमुळे लवकर संसर्ग होण्याची शक्यता जास्त असून त्यांना कोरोना विषाणूची लागण लवकर होऊन त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असते. कबूतरांच्या पंख व  विष्ठेमुळे फुफुसांना जंतुसंसर्ग होतो,न्यूमोनिया,अस्थमा,ब्रॉकयटीस बळावतो,तसेच अँलर्जी,खोकला व श्वासोश्वासाचा त्रास होतो.

--------------------

एका वर्षात एक कबूतर ११.३ किलो विष्ठा टाकते,तसेच विष्ठेच्या विषारी वायू व पावडरीने जंतुसंसर्ग होऊन रुग्णाचा लवकर मृत्यू होतो, लहान बालके व जेष्ठ नागरिक यांना जंतूसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

 

टॅग्स :कबुतरमुंबईमुंबई महानगरपालिका