Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोराईकरांचा 'नो वॉटर नो व्होट'चा नारा; ३,००० हून अधिक कुटुंबांचा भीषण पाणी संकटाचा सामना

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 21, 2024 17:47 IST

मुंबई-मुंबई महानगर पालिकेच्या बोरिवली खाडीपलिकडे असंलेल्या गोराई गावात  गेल्या एक आठवड्यापासून पाणीपुरवठा होत नाही. आणि त्यामुळे या गावात राहणाऱ्या ...

मुंबई-मुंबई महानगर पालिकेच्या बोरिवली खाडीपलिकडे असंलेल्या गोराई गावात  गेल्या एक आठवड्यापासून पाणीपुरवठा होत नाही. आणि त्यामुळे या गावात राहणाऱ्या ३,००० हून अधिक कुटुंब भीषण पाणी संकटाचा सामना करत आहेत.  पाण्याची समस्या दूर करण्यासाठी हे गावकरी जादा दराने टँकरने पाणी विकत घेत असून तर काही कुटुंबे गावातील तर विहिरीतून अशुद्ध पाणी आणत आहेत.  त्यामुळे गोराईकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत त्यांनी नो वॉटर नो व्होटचा नारा दिला आहे.

धारावी बेट बचाव समितीच्या लुर्डस डिसोझा यांनी लोकमतला सांगितले की,गोराई कोळीवाडा, भंडारवाडा, जुई पाडा व गावातील इतर सर्व भागातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणीच येत नाही. गोराई-उत्तन रोडवर पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली असली, तरी वैराळा तलाव, शेपळी, हलावर,आदिवासी पाडे या भागात अद्याप एक थेंबही पाणी आले नाही. गोराई-उत्तन रोडवर पाण्याचा  दाब नसल्याने या भागात पाणी पोहोचत नाही.या वॉर्डातील जलविभागाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या वैराळा व शेपळी या भागांना भेटी देऊन पाहणी अहवाल तयार केला होता. या भागात पाणी पोहोचत नसतानाही, आम्हा ग्रामस्थांना मीटर रीडिंगसाठी कोणीही या भागात फिरकल्याशिवाय पाण्याची बिले पाठवण्यात आली. आम्ही  आर/मध्य वॉर्ड ऑफिसरला पत्र लिहून येथील नागरिकांना पाण्याची बिले येत असल्याची तक्रार केली आहे आणि आम्हाला वर्षभर पाण्याचा थेंबही मिळत नसताना, आम्ही गावकऱ्यांनी बिले का भरायची असा सवाल त्यांनी केला.

तर इतरांना त्यांच्या घरापर्यंतचे रस्ते टँकर येण्यासाठी खूपच अरुंद असल्यामुळे,त्यांना दूरून पाणी आणावे लागते.तर परिसरातील विहिरीतील पाणी आमच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पुरेसे पडत नाही.पाण्यासाठी वाहतूक शुल्कासह 500 ते 850 रुपये खर्च येतो.निवडणुका तोंडावर आल्यावर पाण्याची समस्या सोडवण्याची पोकळ आश्वासने दिली जातात. परंतू निवडून आल्यावर लोकप्रतिनिधींची आश्वासने वाया जातात अशी टिका लुर्डस डिसोझा यांनीकेली.

गोराई शेतकरी विकास संस्थेचे सचिव डेसमंड पॉल यांनी सांगितले की,आमच्या कुलवेम आणि गोराई भागात भीषण पाणी टंचाई असून नळाला थेंब थेंब पाणी येते.या परिसरातील पाण्याचे संकट आम्हाला काही नवीन नाही,गावकरी आम्ही पाण्याच्या टँकरवर महिन्याला ७,००० रुपये खर्च करतो.त्यामुळे आम्हाला पालिकेने पाणी द्यावे,आणि रोजच्या त्रासातून आमची मुक्तता करावी अशी मागणी त्यांनी केली.गोराई गावलाच पाणी येत नाही तर गोराई उत्तन रोड वर आणि येथील आदिवासी पाड्यांमध्येतर नागरिकांचे पाण्याविना अतोनात हाल होत असल्याची माहिती पॉल यांनी दिली.

 पालिकेच्या आर मध्य विभागाच्या साहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी लोकमतला सांगितले की,भौगोलिक स्थितीनुसार ज्या भागात पाण्याची जलवाहिनी टाकणे शक्य नाही त्यांना पालिका मोफत ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा करते.गोराई गावात सक्शन टँकचे काम सुरू असून येत्या सहा सात महिन्यात सदर काम पूर्ण होईल.त्यानंतर मनोरी तून जलवाहिनीद्वारे पाणी या सक्शन टँक मध्ये साठवल्यावर येथील पाणी समस्या दूर होईल.