Join us  

गोराईचे आदिवासी पाडे मूलभूत सुविधांपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 4:11 PM

Basic amenities : आदिवासी पाड्यांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतर देखिल देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बोरिवली पश्चिम  गोराई खाडी पलीकडील गोराई येथील आदिवासी पाडे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.

राज्यातील आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या अभिषेक सामाजिक व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुनीता नागरे यांनी नुकतीच गोराई येथील मुंडा आदिवासी पाडा, छोटी डोंगरी व मोठी डोंगरी आदिवासी पाड्यांना नुकतीच भेट दिली. येथील आदिवासी पाड्यांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी गोराई रिसॉर्ट असोसिएशनचे अध्यक्ष व समाजसेवक जोरम राजा कोळी उपस्थित होते. यावेळी मुंंडा, छोटी डोंगरी व मोठी डोंगरी आदिवासी महिलांना व त्यांच्या कुटुंबाला 500 मास्कचे वाटप जोरम राजा कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंडा आदिवासी पाड्यात स्वातंत्र्याचा 73 वर्षांनंतरही तेथे मूलभूत गरजा पोहोचलेल्या नाही.  येथील आदिवासी पाड्याला अजूनही पालिकेचे  पाणी किंवा बोरिंग चे पाणी मिळालेले नाही. येथील आदिवासी बांधव आजही एका पाण्याच्या ड्रमला 100 रुपये या दरान पाणी विकत घेऊन आपली उपजीविका चालवत आहे. पिण्यासाठी पाणी नाही, अंघोळी व धुणीभांडी या सर्व दिनक्रमाला लागणारे पाणी त्यांना विकत घ्यावे लागत आहे. सध्या कोरोना काळात त्यांच्या हाताला  काम धंदा नाही.  दोन वेळेच्या अन्नासाठी मारामारी करावी लागते,मग  अशा परिस्थितीत ते पाणी कसे विकत घेणार  हा खूप मोठा प्रश्न आहे. येथील आदिवासी पाड्यांच्या विदारक समस्यांचा पाढाच येथील संजय कोलेकर व संगीता वाघे यांनी सुनीता नागरे यांना कथन केला.

 गोराई गावात पालिकेचे छोटे हॉस्पिटल असून ते फक्त तीन वाजेपर्यंत सुरू असते.या हॉस्पिटल मध्ये ठराविकच औषधे उपलब्ध असून सर्पदंशावर औषधे नाही.प्रसूतिगृहाची सुविधा गोराईत उपलब्धच नसल्याने  त्यांना उपचारार्थ  भाईंदर किंवा बोरवलीला जावे लागते  एवढा लांबचा पल्ला गाठेल पर्यंत  जीवित हानी होण्याची शक्यता असते. याकडे राज्य सरकार व मुंबई महापालिकेने  गांभीर्याने लक्ष द्यावे ही येथील रहिवाशांना तर्फे प्रशासनाला कळकळीची विनंती करण्यात येणार असल्याचे सुनीता नागरे यांनी सांगितले.

 मोठा डोंगरी आदिवासी पाड्यातील  येथील   काही नागरिकांन  लाईट अजूनही मिळालेली नसून  पालिकेचे  पाणी देखिल अजूनही मिळालेले नाहीकारण जातीचा दाखला नसल्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना घेता येत नाही. जातीचा दाखला मिळत नाही,  कारण त्यांच्याकडे 50 ते 54  सालचा काही पुरावा नाही. याकडे  सरकारने प्रामुख्याने  लक्ष देऊन  त्यांना जातीचा दाखला कसा मिळेल यासाठी ठोस प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी केली.

 त्याचप्रमाणे छोटी डोंगरीपाडा येथील बाथरूमच्या टाक्या भरलेल्या आहेत.येथे झाडू रोजच्या रोज मारला जात नाही.या आदिवासी पाड्यात प्रामुख्याने  पाणीप्रश्न आहे.याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नाही. येथील वनिता कोटम या आदिवासी महिलेने येथील विदारक स्थिती कथन केल्याची माहिती त्यांनी दिली.

येथील आदिवासी पाड्यांच्या समस्या महापालिका व शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी अभिषेक सामाजिक संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका