लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पाकिस्तानवर १९७१ साली मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने देशाच्या चारही बाजूंना ‘स्वर्णिम विजय मशाल’ची दौड सुरू आहे. देशाच्या पश्चिम भागातील मशाल बुधवारी मुंबईत दाखल झाली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणातील शानदार सोहळ्यात ‘स्वर्णिम विजय मशाल’चे स्वागत केले.
पाकिस्तानवर १९७१ साली मिळविलेला ऐतिहासिक विजय आणि त्यातून झालेल्या बांग्लादेश या स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. या प्रित्यर्थ १६ डिसेंबर २०२० रोजी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विजय मशाल पेटविण्यात आली. तिथून देशाच्या चारही भागात या मशालीची दौड सुरू आहे. यातील पश्चिम भागातील मशाल मुंबईत दाखल झाली. लष्करी आणि नागरी मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मशालीचे स्वागत केले. या शानदार सोहळ्यात १९७१ च्या युद्धात शौर्य गाजविणाऱ्या चक्र पुरस्कार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तर, भारतीय हवाई दलाच्या हेलिकाॅप्टर्सनी गेट वे वरून फ्लाय पास्ट केले. तर, तिन्ही संरक्षण दलांच्या बँड पथकांनी आपली कला सादर केली.
मुंबईत ९ सप्टेंबरपर्यंत ही विजयी मशाल असणार आहे. त्यानंतर पणजीकडे ती रवाना होईल. या कालावधीत संरक्षण दलांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा मुख्यालयातील प्रतिनिधींसह ही विजयी मशाल १९७१ च्या युद्धातील हुतात्म्यांच्या आणि विविध चक्र पुरस्कार्थ्यांच्या घरी नेली जाणार आहे.
फोटो ओळ
गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वर्णिम विजय मशालीचे स्वागत केले. यावेळी व्हाइस ॲडमिरल आर. हरि कुमार, लेफ्टनंट जनरल एस. के. प्रश्न, एअर व्हाइस मार्शल एस. आर. सिंग उपस्थित होते.