सलमान खानच्या व्यक्तिमत्त्वाचा एक सकारात्मक पैलू एवढा प्रभावी आहे की तो त्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. संकटात दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या मोजक्या बॉलीवूड ताऱ्यांमध्ये सलमानचा समावेश होतो. दुसऱ्यांना मदत करण्यात सलमान नेहमीच पुढे राहिला आहे. त्याच्या संपर्कातील अनेकांना सलमानच्या या सहृदयतेचा अनुभव आला आहे. सलमानच्या मदतीने आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे आनंद निर्माण झाला हे सांगणारे हजारो किस्से त्यांच्याकडे आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास सलमानला याच दिलदारपणामुळे गोल्डन हार्ट बॉय असे म्हटले जाते. काही वर्षांपूर्वी सलमानने ‘बीइंग ह्युमन’ नावाची धर्मादाय संस्था सुरू केली. या संस्थेद्वारे तो सुरुवातीला पैशांअभावी उपचार न घेऊ शकणाऱ्या लोकांना मदत करत होता. नंतर तो आपल्या या संस्थेची व्याप्ती वाढवत गेला. बीइंग ह्युमन आज खूप मोठा ब्रॅण्ड बनला असून तो अनेक स्तरांवर गरजवंतांच्या मदतीला धावून जात आहे. सलमानला सामान्यपणे आपल्या या दानशूरतेच्या पैलूबाबत बोलणे आवडत नाही. तो याला आपली जबाबदारी मानतो. अलीकडेच काश्मीरमध्ये ‘बजरंगी भाईजान’च्या चित्रीकरणादरम्यान एका महिलेने त्याची भेट घेतली. या महिलेचे घर उद्ध्वस्त झाले होते. सलमानने तिच्या मुलाला दत्तक घेत त्याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. सलमानच्या मदतीचे असे किती तरी किस्से आहेत. धर्मनिरपेक्षता हा सलमानच्या गुणसंपन्नतेचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहे. सलमानचे कुटुंब सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे. त्याच्या कुटुंबातील तीन प्रमुख सदस्य वेगवेगळ्या धर्माचे आहेत. पिता मुस्लीम, आई हिंदू आणि पिता सलीम यांची दुसरी पत्नी हेलन ख्रिश्चन आहे. हेलन याही या कुटुंबासोबतच राहतात. भाऊ अरबाज खान याने मलाइका अरोराशी विवाह केला तर दुसरा भाऊ सोहेलने ब्राह्मण कुटुंबातील सीमाशी लग्न केले आहे. सलमानच्या घरी सर्व सण उत्साहात साजरे केले जातात. सलमान दरवर्षी घरी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करतो. काही मुस्लीम संघटनांनी याला आक्षेप घेत फतवा काढला होता. मात्र, सलमानने हा फतवा ठोकरून लावत आपण गणपती आणणे बंद करणार नसल्याचे ठासून सांगितले आणि तसे केलेही. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्याने पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची उघडपणे बाजू घेतली. अनेक मुस्लीम संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर सलमानचा ‘जय हो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘जय हो’ला बॉक्स आॅफिसवर मोठे यश मिळाले नाही. तेव्हा मोदींना पाठिंबा दिल्यामुळे मुस्लिमांचा एक गट सलमानवर नाराज होता व त्यामुळेच ‘जय हो’ला यश मिळाले नाही, असे बोलले गेले. मात्र, सलमानने त्याची पर्वा केली नाही आणि आजही तो आपल्या धर्मनिरपेक्ष विचारांचा पूर्वीप्रमाणेच पुरस्कार करतो.
गोल्डन हार्ट बॉय
By admin | Updated: May 7, 2015 04:31 IST