Join us

सोने व्यापा-याला लुटणारे दरोडेखोर सापडले

By admin | Updated: August 14, 2014 00:28 IST

एसटी बस स्थानकासमोर शनिवारी रात्री एका सोने व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील सोन्याचा ऐवज असलेली बॅग चार दरोडेखोरांनी पळवली.

नागोठणे : एसटी बस स्थानकासमोर शनिवारी रात्री एका सोने व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील सोन्याचा ऐवज असलेली बॅग चार दरोडेखोरांनी पळवली. या चार जणांपैकी तिघांना पकडण्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूर पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर आणि सहाय्यक पो. निरीक्षक संजय मोगले यांनी दिली.येथील एसटी बस स्थानकासमोर बप्पी नेपालचंद्र महंती यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. बुधवारी रात्री दुकान बंद करून ते पन्नास हजार रु पयांची रोख रक्कम, पाच लाखांचे सोन्याचे व नव्वद हजारांचे चांदीचे दागिने भरलेली बॅग घेऊन घरी निघाले होते. त्यावेळी चार चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या डोक्यात कोणत्यातरी हत्याराने फटका मारला व दुसऱ्याने त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली आणि ते चौघेजण एसटी बस स्थानकातून अंबा नदीच्या बाजूकडे पसार झाले. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तपास सुरू असताना शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्गावरील वासिंद या गावात काही संशियत फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर त्यांनी नागोठणे येथे दरोडा घातल्याचे कबूल केले. रमेश वसुनिया, शत्रू कालिया भागोद आणि जीतरा मंगा वसुनिया अशी तीन दरोडेखोरांची नावे असून ते मध्यप्रदेश राज्यातील झावबा येथील आहेत. यापैकी रमेश वसुनिया हा दरोडेखोर नागोठणे येथील रेल्वेच्या कामात काही महिने कार्यरत होता व लुटलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात त्याने दोन वेळा फेऱ्याही मारल्याचे उघडकीस आले आहे. हे सर्व सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर धुळे, नाशिक जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यापैकी एक जण सात वर्षे शिक्षा भोगून सुद्धा आलेला आहे. यातील चौथा दरोडेखोर सापडला नसल्याचे बाळासाहेब दरेकर यांनी सांगितले.