Join us

अक्षय तृतीयेला सोनेही डिजिटल; झवेरी बाजारात खरेदीने गाठला १०० कोटींचा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:06 IST

सचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुंबईकर ग्राहकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने ...

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुंबईकर ग्राहकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने सोन्याची खरेदी करण्यास पसंती दिली. दुकाने बंद असल्याने सोने खरेदीचे अधिकाधिक व्यवहार हे ऑनलाईन झाले असून, आजच्या शुभ मुहूर्ताचा विचार करता झवेरी बाजारात १०० कोटींच्या सोन्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय झाला आहे.

मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, लोकांनी ऑनलाईन खरेदीवर भर दिला. ऑफ लाईन खरेदी झाली नाही. कारण बहुतांशी दुकाने बंद होती. लोकांनी आगाऊ रक्कम दिली आहे. सोन्याची खरेदी केली आहे. नाण्यांची खरेदी केली आहे. ज्यांच्या घरी लग्ने आहेत त्यांनी ज्वेलरी बुक केली आहे. बहुतांशी व्यवहार डिजिटल झाले आहेत. व्हिडिओ कॉलिंगवर आजचा बिझनेस झाला आहे. नेहमीच्या शुभमुहूर्तांवर ५०० कोटींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. मात्र कोरोनामुळे आज हा आकडा १०० कोटींवर आला आहे. ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कॅशलेस बिझनेस झाला आहे. डिजिटल पेमेंट झाले. २० ते २५ टक्के व्यवसाय झाला आहे.

मुंबईच्या उपनगरात काही ठिकाणी शटर अर्धे उघडे ठेवून सोन्याचे व्यवहार केले जात होते. दुपारी १ वाजेपर्यंत आणि रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत सराफांच्या दुकानांत सोन्याची खरेदी-विक्री केली जात होती. परिणामी सोन्याच्या ऑफलाईन खरेदीलाही प्राधान्य दिले जात होते. सराफांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा भाव जास्त आहे. आजघडीला सोन्याचा भाव प्रतितोळा ४७ हजार आहे. यात आणखी वाढ होणार आहे. काही ग्राहकांकडे पूर्वीची उधारी आहे. कोरोना काळात ती वसूल झाली आहे. मात्र नव्याने सोने खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. दिवसाला दीडएक लाखदेखील व्यवसाय होत नाही. डिसेंबर महिन्यापर्यंत अशीच अवस्था राहणार आहे.

........................................