Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेने गोकूळधाम मलनिस्सारण प्रश्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगाव (पूर्व) गोकूळधाम येथील अन्य इमारतींमधील मलनिस्सारण लाइन महानगरपालिकेच्या मुख्य वाहिनीला जोडण्यासाठी पाहणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोरेगाव (पूर्व) गोकूळधाम येथील अन्य इमारतींमधील मलनिस्सारण लाइन महानगरपालिकेच्या मुख्य वाहिनीला जोडण्यासाठी पाहणी करून मनपाच्या पी दक्षिण विभागीय कार्यालयाच्या सहकार्याने सुनियोजित आराखडा तयार करावा, अशी सूचना जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली.

गोरेगाव (पूर्व) गोकूळधाम येथील रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्‍नी वायकर यांनी पालिकेचे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी यांच्या समवेत गोकूळधाम येथे बैठक बोलावली होती.

येथील काही इमारतींमधील मलनिस्सारण लाइन मनपाच्या मुख्य मलनिस्सारण वाहिनीशी न जोडता थेट गटारात सोडण्यात आली आहे. या नाल्यातील पाणी रस्त्यावर येत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी बैठकीत केली. त्याचबरोबर काही ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावेत, काही वेळेला पाण्याचे प्रेशर मिळत नाही, पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी साचते अशा तक्रारी मांडल्या.

या बैठकीला मनपाचे परिमंडळ ४ चे उपायुक्त भारत मराठे, कार्यकारी अभियंता सुशील उभाळे, साहाय्यक अभियंता मंदार महिंगडे, कार्यकारी अभियंता (रस्ते) संजय बोरसे, गोकूळधाम येथील रहिवासी तसेच शिवसेनेचे उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, शाखाप्रमुख संदीप गाढवे, शाखा संघटक अपर्णा परळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

गोकूळधाम येथे २०१०-११ मध्ये मलनिस्सारण वाहिनी टाकण्यात आली होती. मग इनलेट लाइन टाकण्याचे काम अद्याप पूर्ण का करण्यात आले नाही? त्याचप्रमाणे येथील नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतींची मलनिस्सारण वाहिनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य वाहिनीला का जोडण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केला.

तसेच जनतेच्या मागणीनुसार शॉपिंग मॉल, शाळा तसेच हॉस्पिटल या ठिकाणी पाहणी करून गतिरोधक बसवावेत. त्याचबरोबर या भागात ज्या ठिकाणी स्ट्रॉम वॉटर ड्रेन नसतील त्याचीदेखील पाहणी करून प्रस्ताव तयार करावा, ही कामे वेगाने पूर्ण केल्यास येथे ज्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचत आहे त्या ठिकाणच्या रहिवाशांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार वायकर यांच्या सूचनांची दखल घेत उपायुक्त भारत मराठे यांनी, येथील ज्या भागांमध्ये अद्याप मलनिस्सारण वाहिनी टाकण्यात आली नाही, त्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून ती टाकण्यात यावी, अशी सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

--------------------------------------