Join us

गावाबाहेर जाताय, कुलूपबंद घर सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:06 IST

मुंबई : सण, उत्सवांच्या काळात घर बंद करून गावी जाणाऱ्या मंडळींची बंद घरे चोरट्यांच्या टार्गेटवर आहे. त्यामुळे बाहेर जाताना ...

मुंबई : सण, उत्सवांच्या काळात घर बंद करून गावी जाणाऱ्या मंडळींची बंद घरे चोरट्यांच्या टार्गेटवर आहे. त्यामुळे बाहेर जाताना आपला किमती ऐवज सुरक्षितरित्या ठेवून घराबाहेर पडण्याचे आवाहन वेळोवेळी पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट महिन्यात मुंबईत एकूण ५२ हजार ५७९ गुन्हे नोंद झाले. यापैकी ४४ हजार १४२ गुह्यांची उकल करण्यात आली आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनचे सुरुवातीचे मुख्यत्वे करून एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र, जून महिन्यात अनलॉकचा टप्पा सुरु होताच जूनपासून गुह्यांचे प्रमाण पुन्हा जैसे थे स्वरुपात आले. यात चोरी, वाहन चोरीत वाढ झाली आहे. तसेच हत्या, हत्येचा प्रयत्नाच्या घटनाही डोके वर काढत आहेत.

यावर्षी घरफोडीच्या १ हजार १२९ गुह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ५४९ गुह्यांची उकल करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच ८ महिन्यांत हा आकडा १ हजार १० होता. पोलिसांकडून गस्त वाढवून नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे.

कोणत्या वर्षात किती घरफोड्या

२०१९ - २,०५८

२०२० - १,६४५

२०२१ (ऑगस्टपर्यंत) - १,१२९

आठ महिन्यांत ११२९ घरफोड्या

गेल्या ८ महिन्यांत १ हजार १२९ घरफोडीच्या घटनांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात १ हजार १० घटनांची नोंद पोलीस दफ्तरी झाली होती.

५८० घटनांचा अजूनही ‘तपास सुरू’!

गेल्या ८ महिन्यांत दाखल गुह्यांपैकी अवघ्या ५४९ गुह्यांची उकल झाली असून, ५८० गुह्यांचा तपास सुरु आहे.

अनलॉकनंतर चोऱ्याही वाढल्या

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनमुळे रोडावलेल्या रस्त्यावरील गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. चोरी, वाहन चोरीच्या घटनांबरोबर घरफोडीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या ८ महिन्यांत चोरीचे २ हजार ८६५ गुन्हे पोलीस दफ्तरी नोंद झाले आहेत.