Join us  

देवा तू मला शिक्षा कर, खासदार गोपाळ शेट्टींचे भावनिक उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 4:36 PM

ख्रिस्ती समाजाबद्दल आपल्याला नितांत आदर आहे. जर, मी ख्रिस्ती समाजाविरोधात एका टाचणी इतकाही बोललो असेल तर

मुंबई - ख्रिस्ती समाजाबद्दल आपल्याला नितांत आदर आहे. जर, मी ख्रिस्ती समाजाविरोधात एका टाचणी इतकाही बोललो असेल तर देवा तू मला शिक्षा कर, असे भावनिक उद्गार उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले आहे. मालवणीत 1 जुलै रोजी घेतलेल्या एका सभेत उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चनांनी स्वातंत्र्यलढ्यात कोणतंही योगदान दिले नसल्याचे वक्तव्य केले होते. 

आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून ख्रिश्चनांच्या भावना दुखावण्याचा माझा काडीमात्र उद्देश नव्हता, असे खासदार शेट्टी यांनी लोकमतशी बोलतांना म्हटले. याबाबत मी माझी भूमिका प्रसिद्धी माध्यमांकडे मांडलीही होती. मात्र, हा विषय संपायचे नावच घेत नव्हता. त्यामुळेच, जर मी ख्रिस्ती समाजाविरोधात बोललो असेल तर देवाकडे माफी न मागता तू मला शिक्षा कर अशी करुणा व्यक्त करत असल्याचे शेट्टींनी म्हटले आहे. 

आपण याबाबतीत ख्रिश्चन समाजासोबत चर्चेसाठी बॉम्बे कॅथॉलिक सभेच्या उत्तर मुंबईतील सर्व चर्चमध्ये जात असून येशू ख्रिस्त आणि मदर मेरी यांच्या पुढे नतमस्तक होऊन फादर व ख्रिस्त धर्मगुरुंची भेट घेत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. ख्रिस्ती समाज किंवा अन्य कोणत्याही समाजाची भावना कदापी दुखावण्याचा आपला हेतू नव्हता हे त्यांना पटवून देत असल्याचेही त्यांनी सांगितले. मालवणी येथे आपण मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी 5 एकर जागा मिळवून दिली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ना एकट्या हिंदू धर्माचे योगदान होते ना एकट्या मुस्लिम समाजाचे योगदान होते, संपूर्ण हिंदुस्थानी नागरिकांचे योगदान होते, असे वक्तव्य मौलविनी केले होते. त्यामुळे मौलविंच्या भाषणाचा धागा पकडून आपल्या देशात इंग्रज होते म्हणून ख्रिस्ती समाज हा स्वातंत्र्य लढ्यात नव्हता या आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याची भूमिका शेट्टी यांनी विषद केली.

टॅग्स :गोपाळ शेट्टीख्रिसमस