Join us
Daily Top 2Weekly Top 5

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...

By admin | Updated: September 11, 2016 03:16 IST

सहा दिवसांपूर्वी धूमधडाक्यात उत्साहात घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पांना शनिवारी मुंबईकरांनी साश्रुनयनांनी भावपूर्ण निरोप दिला.

मुंबई : सहा दिवसांपूर्वी धूमधडाक्यात उत्साहात घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पांना शनिवारी मुंबईकरांनी साश्रुनयनांनी भावपूर्ण निरोप दिला. गिरगाव, दादर, वर्सोवा, जुहू चौपाट्यांसह कृत्रिम तलावांमध्ये रात्री उशिरापर्यंत गौरी-गणपती विसर्जनासाठी भक्तांची गर्दी होती. काही सार्वजनिक गणपतींचेही विसर्जन झाले. दुपारपासूनच मुंबईत विसर्जनाची लगबग सुरू झाल्यानंतर काही रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले होते. काही गौरी-गणपती विसर्जनासाठी डीजेही लावण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून इको-फ्रेण्डली गणेशोत्सव साजरा करण्याचा ट्रेण्ड असल्यामुळे अनेक भक्तांनी गौरी-गणपतींचे विसर्जन कृत्रिम तलावांत केले. समुद्रात निर्माल्य आणि पूजेचे साहित्य टाकल्याने होणारे प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य कलश चौपाट्यांवर ठेवण्यात आले होते. महापालिका आणि पर्यावरण संस्थांनी केलेल्या आवाहनाला मुंबईकरांनी विसर्जनाच्या दिवशी सकारात्मक प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)‘निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी’, ‘पायी हळूहळू चाला...मुखाने गजानन बोला’, ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणांनी अवघी मुंबापुरी दुमदुमून गेली होती. लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाची जय्यत तयारी मुंबईकरांनी केली होती. ढोल-ताशा, पुणेरी ढोल पथकांच्या गजरात तरुणाई विसर्जन मिरवणुकीत थिरकत होती. पोलिसांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे गौरी-गणपतींचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले. चौपाट्यांवर कोणाताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जीवरक्षक, पोलीस तैनात करण्यात आले होते. गुरुवारी दादर, गिरगाव चौपाटीजवळ स्टिंग रे मासे आढळून आल्यामुळे विसर्जनावेळी विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. महापालिकेनेही या माशांचा त्रास होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली होती.